पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या शहरांमध्ये संचार मनाई आदेश कालावधी 31 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्य सरकारने सर्व नियमांचे पालन करुन दुकाने व अन्य व्यवसाय सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात शहरात दररोज सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत संचार मनाई आदेश लागू राहणार आहे. पुणे महापालिकेचे क्षेत्र, पुणे व खडकी कँटोन्मेंट क्षेत्रात आदेश लागू राहणार आहेत, असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदेशात नमूद केले आहे.
महापालिकेने खाटांची संख्या वाढविली
शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासोबत रुग्ण, संशयितांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी महापालिकेने रुग्णालयातील खाटा आणि क्वारंटाइनची क्षमता वाढविली आहे. सध्या खबरदारी म्हणून सुमारे ३५ हजार बेडची यंत्रणा उपलब्ध केली जात असून, याठिकाणी अन्य सुविधाही उभारण्यात येत आहेत. पुण्यात आजघडीला पावणेदोन हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण वाढण्याची शक्यता वाढली असताना विलगीकरणाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. मात्र, सध्या कोरोनोमुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असल्याने इतक्या प्रमाणात बेडची गरज नसेल, तरीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी स्पष्ट केले.
वाढत्या रुग्णसंख्येचा धोका
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून पावणेदोन महिने होत आले; या काळात कोरोनाच्या सव्वाचार हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील सव्वादोन हजार रुग्ण बरे झाले तर, २३० रुग्ण मरण पावले आहेत. त्यामुळे सध्या १ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तरीही भविष्यात रुग्ण वाढीची शक्यता असल्याने सर्व रुग्णांना उपचार देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्याचसोबत रुग्णांच्या संपर्कातील संशयित आणि अन्य रहिवाशांच्या सोयीसाठी विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. त्यानुसार सर्व हॉस्पिटल, शाळा महाविद्यालयाची वसतिगृहे, महापालिकेच्या मिळकतींमधील खाटांची क्षमता ३५ हजारापर्यंत असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागागकडून सांगण्यात आले. याविषयी महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले, ‘‘विलगीकरणासाठी सुमारे ४ हजार ५० बेडची तयारी असून, त्याठिकाणी १ हजार ८०८ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय, आणखी १२ हजार खाटा उपलब्ध असतील. तर बालेवाडीत मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली आहे. तर खबरदारी म्हणून पुढच्या आठ दिवसांत एकूण ३५ हजार बेड उभारण्याची तयारी आहे. ’’

