आंदोलनानंतर धसांना पवारांच्या बैठकीत एंट्रीचा निरोप - Suresh Dhas Got Entry in Sharad Pawar Meeting after agitation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

आंदोलनानंतर धसांना पवारांच्या बैठकीत एंट्रीचा निरोप

महेश जगताप
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

ऊस तोडणी कामगारांच्या बैठकीत प्रवेश नाकारल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आंदोलन सुरु केले होते. आपल्याला प्रवेश नाकारल्याच्या  निषेधार्थ त्यांनी व्हीएसआयच्या गेटवर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर काही वेळाने त्यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला. 

पुणे : पुणे : ऊस तोडणी कामगारांच्या बैठकीत प्रवेश नाकारल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आंदोलन सुरु केले होते. आपल्याला प्रवेश नाकारल्याच्या  निषेधार्थ त्यांनी व्हीएसआयच्या गेटवर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर काही वेळाने त्यांना बैठकीत प्रवेश दिला जात असल्याचा निरोप आला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक सुरु आहे. ऊस तोडणी कामगारांमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांना या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर धस यांनी आपल्या समर्थकांसह आंदोलन सुरु केले. अभ्यासू लोकांना बैठकीच्या जाणीवपूर्वक बाहेर ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांना खऱ्या समस्यांची माहिती नाही, अशा लोकांशी करार करुन जुजबी वाढ देण्याचा साखर संघाच्या लोकांचा प्रयत्न आहे. मला शरद पवार यांच्याविषयी काहीही म्हणायचे नाही. मात्र, खऱ्या समस्या पुढे येऊ नयेत, यासाठी मला बाहेर ठेवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर त्यांना चर्चेसाठी बैठकीत बोलावून घेण्यात आले. 

मजुरीच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी ऊस तोडणी कामगार संघटना साखर कारखानदारांशी वाटाघाटी करत आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीस बोलावण्यात आले आहे. सुरेश धस हे गेले काही दिवस आक्रमकपणे या मजुरांचे प्रश्न मांडत आहेत. तसेच तोडगा निघाल्याशिवाय मजुरांना साखर कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन ते करत होते. तसेच मजुरी दरात शंभर टक्क्यांहून अधिक वाढीची आक्रमक मागणी त्यांनी केली होती. 

त्यांच्या या मागणीमुळे पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचे मतभेद झाल्याचे दिसून येत होते. ऊस तोडणी कामगारांमध्ये धस हे आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंकजा मुंडे समर्थक त्यांच्यावर टीका करत होते. तसेच पंकजा व धस यांच्यातही आधीप्रमाणे सख्य नसल्याचे या निमित्ताने दिसून आले. शरद पवारांसोबत बैठक झाल्याशिवाय ऊस तोडायला जाऊ नका, असे आवाहन धस करत होते. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख