sharad pawar cherished his memories after reading his own wedding invitation card | Sarkarnama

स्वतःची लग्नपत्रिका पाहून शरद पवार रमले जुन्या आठवणींत 

मिलिंद संगई 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

संभाजी दराडे यांना जुन्या लग्नपत्रिका जमा करण्याचा छंद होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याही लग्नाची पत्रिका त्यांनी अशीच जपून ठेवली होती. दराडे आज हयात नाहीत, पण त्यांचे चिरंजीव संजय दराडे यांनी या आठवणींना आज (ता. 1 ऑगस्ट) उजाळा दिला...निमित्त होते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे. 

बारामती : अनेकांना विविध प्रकारचे छंद असतात आणि त्या छंदामुळे जुन्या आठवणींना आपोआप उजाळा मिळतो. त्यामुळे संबंधित व्यक्ती त्या वेळच्या भावविश्वात जाऊन रममाण होते. अशा प्रकारचा छंद जोपासला होता, बारामती येथील (कै.) संभाजी शिवराम दराडे यांनी. 

संभाजी दराडे यांना जुन्या लग्नपत्रिका जमा करण्याचा छंद होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याही लग्नाची पत्रिका त्यांनी अशीच जपून ठेवली होती. दराडे आज हयात नाहीत, पण त्यांचे चिरंजीव संजय दराडे यांनी या आठवणींना आज (ता. 1 ऑगस्ट) उजाळा दिला...निमित्त होते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे. 

 

बारामती येथील श्री छत्रपती शाहू हायस्कूलच्या मैदानावर 1 ऑगस्ट 1967 रोजी शरद पवार हे प्रतिभाताई यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्या वेळी त्यांच्या लग्नाची पत्रिका छापण्यात आली होती. ती लग्नपत्रिका संभाजी दराडे यांनी जपून ठेवली होती.

दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोविंद बागेत त्यांनी दोन वर्षांपूर्वी खुद्द शरद पवार यांना ही लग्नपत्रिका फ्रेम करुन दिली होती. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या जनवस्तूसंग्रहालयात ही लग्नपत्रिका आठवण म्हणून ठेवण्यात यावी, अशी संभाजी दराडे यांची इच्छा होती. 

स्वतः शरद पवार यांनीही मोठ्या कौतुकाने आपली लग्नपत्रिका पाच दशकांनंतर पाहिल्यावर तेही काही काळ जुन्या आठवणीत रमून गेले होते, असे संजय दराडे यांनी सांगितले. त्या लग्नपत्रिकेवर प्रतिभाताई यांचा उल्लेख विख्यात क्रिकेटपटू सदूभाऊ शिंदे यांची कन्या असा करण्यात आला होता. अत्यंत साध्या अशा या पत्रिकेखाली पवार यांचे पिताश्री गोविंदराव पवार आणि आई शारदाबाई पवार यांचीही नावे आहेत. 

शरद पवार यांच्या लग्नाला आज (ता. 1 ऑगस्ट) 53 वर्षे पूर्ण होत असताना संजय दराडे यांना या लग्नपत्रिकेची व त्यांच्या वडिलांच्या छंदाचीही आठवण झाली. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख