दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी बडतर्फ पोलिसासह पत्रकाराला पोलीस कोठडी

बांधकाम व्यावसायिकाला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपींनी न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बराटे हा फरार आहे.
shailesh jagtap devendra jain and dipti aher remanded in police custody
shailesh jagtap devendra jain and dipti aher remanded in police custody

पुणे : जमीन व दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन व दीप्ती आहेर यांची न्यायालयाने बुधवारी चार दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील आरोपी व माहिती अधिकार कार्यकता रविंद्र बऱ्हाटे आणि सराईत गुन्हेगार अमोल चव्हाण हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बराटे आणि चव्हाण यांच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांत प्रत्येकी पाच गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी (वय 64, पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन दीप्ती आहेर (वय 34, रा. व्हीला विस्टा अपार्टमेंट, बावधन),  रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा), शैलेश हरिभाऊ जगताप (वय 49, रा. विश्वकर्मा इमारत, भवानी पेठ), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाणवाडा, कोथरुड) आणि देवेंद्र फूलचंद जैन (वय, 52, प्रियदर्शनी सोसायटी, गणेशमळा, सिंहगड रोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणे, संगनमत करुन कट रचणे, धमकावणे अशा प्रकारे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. 

यातील जगताप, जैन आणि आहेर या तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात जगताप, बऱ्हाटे आणि जैन यांची काय भूमिका आहे. आहेर हिचे या सर्व आरोपींशी  काय संबंध आहेत? याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत  आहेत. कागदापत्रांबाबत देखील त्यांच्याकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयास केली. न्यायालयाने त्यांची 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 

या प्रकरणातील आरोपी दीप्ती आहेर हिच्या वतीने अॅड. विजयसिह ठोंबरे यांनी बाजू मांडली. फिर्यादीने उशिरा तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जात खंडणीचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ही तक्रार देण्यात आली आहे, असा युक्तिवाद ठोंबरे यांनी केला. या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे देण्याची मागणी करणारा अर्ज आहेर हिने न्यायालयात आता सादर केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com