सीरम इन्स्टिट्यूट आगीबाबत सखोल चौकशीचे आदेश.. - Serum Institute orders inquiry into the fire Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

सीरम इन्स्टिट्यूट आगीबाबत सखोल चौकशीचे आदेश..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आगीबाबत  सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली आहे. दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  

या प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात देशातून आणि देशाबाहेरही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित असल्याचे मला सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत आग विझवणे आणि दुर्घटनेमुळे होणारी हानी नियंत्रित ठेवणे याला सध्या प्राधान्य देण्यात येत आहे, असे  पवार यांनी सांगितले.  

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. मांजरी येथील कंपनीच्या इमारतीला बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली होती. कोविशिल्ड लसीचं उत्पादन केलं जात आहे, तो भाग सुरक्षित आहे. बीसीजी लस ज्या ठिकाणी तयार केली जाते त्या ठिकाणी ही आग लागली होती.   
 

कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, तो विभाग सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागली होती. कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोरोना लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी कोरोनाची लस ठेवण्यात आलेल्या बिल्डिंग कोणताही धोका नाही, असे सांगण्यात आले. 
 
काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती. तर काही दिवसांपुर्वीच सीरम इन्स्टिट्युटमधून महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात कोवीशील्ड ही लस पाठविण्यात आली. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपुर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. 

सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस निर्मिती केंद्र तसेच अन्य विविध प्रकारच्या लशींचे उत्पादन केले जाते. आग विझविण्याची अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या ब्रांटो या गाडीलाही तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. होते. अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रासह हडपसर, कोंढवा व अन्य केंद्राच्या गाड्या व जवान आग विझविण्याच्या प्रयत्नात आहेत.

आगीच्या ठिकाणी पोलिसही तत्काळ दाखल झाले असून तेथे जमा झालेल्या गर्दीला हटविण्याचे तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे काम हडपसर पोलिसांकडून केले जात आहे. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या 11 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान पाच संशोधकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आग लागलेल्या "आर-बीसीजी' लस निर्मितीच्या मारतीमध्ये लस उत्पादनाशी संबंधीत संशोधक, तंत्रज्ञ व कामगारांचा समावेश आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी काही वेळातच पाच संशोधकांना आग लागलेल्या इमारतीमधून सुखरुप बाहेर काढले. मात्र आतमध्ये आणखी काही जण असण्याची शक्‍यता अग्निशामक दलाने व्यक्त केली आहे. आतमध्ये किती संशोधक, तंत्रज्ञ, कामगार काम करत होते, याबाबतची माहिती अग्निशामक दलाला मिळालेली नाही. तरीही आत मध्ये काही व्यक्ती असण्याची शक्‍यता गृहीत धरून एकीकडे आग विझवितानाच दुसरीकडे आतमधील लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. 

उपाययोजना राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश 

या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून  माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात निर्देश दिले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेत पोहचले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख