रेमडेसिविरसाठी नातेवाईकांचा टाहो! जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या...

पहिली लाट ओसरू लागल्यानंतर रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केले होते.
Relatives of  COVID19 patients protest for remdesivir injection
Relatives of COVID19 patients protest for remdesivir injection

पुणे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने थेट रुग्णालयांमध्ये इंजेक्शनचे वितरण सुरू केले असले तरी अपेक्षित पुरवठा होत नसल्याने नातेवाईकांना अजूनही खेटे मारावे लागत आहे. नातेवाईकांच्या संयमांचा अंत होऊ लागल्याने ते इंजेक्शनसाठी टाहो फोडत आहेत.

राज्यात पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे दैनंदिन इंजेक्शनच्या गरजेच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. परिणामी, रुग्णालयेही हतबल झाली आहेत. प्रशासनाने कंपन्या, डिलरला थेट रुग्णालयांना इंजेक्शन पुरविण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रत्यक्ष पुरवठा कमी होत असल्याने रुग्णालयांकडून नातेवाईकांनाच इंजेक्शन आणण्याचा आग्रह धरला जात आहे. पण खुल्या बाजारात इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईकही हताश झाले आहेत. 

आज अनेक नातेवाईकांनी इंजेक्शनसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ठिय्या मारला. त्यांनी इंजेक्शनसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. पण जिल्हाधिकारीही हतबल झाल्याचे दिसले. ''माझे वडील सहा दिवसांपासून रुग्णालयात आहेत. पण त्यांचे औषधोपचार पूर्ण होऊ शकत नाहीत. ते आयसीयूमध्ये आहेत. मी संपूर्ण शहरामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन शोधत आहे,'' असे एका तरूणीने माध्यमांशी बोलताना सांगितले. 

कंपन्यांचे उत्पादनच कमी

पहिली लाट ओसरू लागल्यानंतर रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांनी उत्पादन कमी केले होते. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात क्षमतेच्या 50 टक्केही उत्पादन होत नव्हते. परिणामी, संपूर्ण देशातच कमी प्रमाणात वितरण होत होते. पण मार्च महिन्यापासून देशात अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे कंपन्यांवर अचानक भार वाढला आहे. उत्पादन क्षमता वाढविली जात असली तरी प्रत्यक्ष मागणी पूर्ण करणे सध्या शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

निर्यात थांबविली तरी परिस्थिती जैसे थे

केंद्र सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजूनही देशातील अनेक राज्यांमध्ये इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयांकडून गरज नसलेल्या रुग्णांनाही इंजेक्शन सुरू केले जात असल्याचा दावा केंद्र सरकारसह राज्यांकडूनही केला जात आहे. पण त्यावर सध्या कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंजेक्शनची तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com