पक्षच बदलायचा होता तर खडसेंनी आरपीआयमध्ये यायला हवे होते - रामदास आठवले - Ramdas Athavale Reacts on Ekanath Khadse Decision about Leaving BJP | Politics Marathi News - Sarkarnama

पक्षच बदलायचा होता तर खडसेंनी आरपीआयमध्ये यायला हवे होते - रामदास आठवले

मिलिंद संगई
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

एकनाथ खडसे यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआय मध्ये यायला पाहिजे होते, राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी चूक केली आहे, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज खडसे यांच्या पक्षांतराबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली. 

बारामती : एकनाथ खडसे यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआय मध्ये यायला पाहिजे होते, राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी चूक केली आहे, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज खडसे यांच्या पक्षांतराबाबत प्रतिक्रीया व्यक्त केली. 

बारामती तालुक्यातील क-हावागज येथे पूराने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन आठवले फलटणकडे रवाना झाले. त्या प्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. आठवले म्हणाले, महाराष्ट्रात पावसाने जे नुकसान झाले आहे, त्या संदर्भात मी पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून मदतीची मागणी करणार आहे. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनीही केंद्राकडून मदतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

केंद्र तर मदत नक्की करेलच पण राज्य सरकारची जबाबदारी मोठी आहे, 
या पावसाने शेतकरी उध्वस्त झाले असल्याने त्यांना एकरी 50 हजार रुपये मदत मिळाली पाहिजे. केंद्राच्या मदतीबाबत आम्ही पाठपुरावा करुच पण जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई करण्याबाबत राज्याने तातडीने निर्णय घ्यायला हवा. 

एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे 16 आमदारही फुटणार अशी चर्चा असली तरी असे काही होणार नाही, त्यांना पक्ष बदलायचा होता तर रिपब्लिकन पक्षात त्यांनी याव अशी आमची भूमिका होती, पण आता त्यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतला आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांना आमदारकी किंवा मंत्रीपद मिळेल की नाही हा राष्ट्रवादीचा निर्णय असेल पण खडसे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घ्यायला नको होता, असे आठवले म्हणाले. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख