राजू शेट्टी म्हणतात, 'मला पुन्हा लोकसभेत जायचे आहे' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा एकट्याचाच भ्रमनिरास केला नाही, तर देशातली कोट्यवधी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यांच्या मायावी बोलण्याला लोक भुलले. अच्छे दिन येणार म्हणूनच लोकांनी त्यांना मते दिली; पण अच्छे दिन आलेच नाहीत
Raju Shetty says, "I want to go to Lok Sabha again
Raju Shetty says, "I want to go to Lok Sabha again

पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा एकट्याचाच भ्रमनिरास केला नाही, तर देशातली कोट्यवधी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यांच्या मायावी बोलण्याला लोक भुलले. अच्छे दिन येणार म्हणूनच लोकांनी त्यांना मते दिली; पण अच्छे दिन आलेच नाहीत,' अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

"सकाळ-ऍग्रोवन'ला दिलेल्या मुलाखतीत शेट्टी यांनी अनेक मुद्यावर आपली मते व्यक्त केली आहेत. 

"जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा मी त्यांच्या सरकारच्या विरोधात होतो. मात्र, तेव्हाचा जीडीपी आणि आजचा जीडीपी यात मोठा फरक आहे. तेव्हाची शेतकऱ्यांच्याबाबतची धोरणे आणि आजची मोदी सरकारची धोरणे बघता आपला देश कुठे चालला आहे? याचे उत्तर मिळेल, असे माजी खासदार शेट्टी म्हणाले. 

"नरेंद्र मोदी यांची वक्तृत्व कला चांगली आहे. लोकांना त्यांचे भाषण प्रभावी वाटले; म्हणून लोकांनी त्यांना मते दिली. आम्हालाही वाटले हा माणूस शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करेल. मात्र, तसे काही घडले नाही. त्यांचे बोलणे मायावी आहे, हे समजल्यावर आम्ही त्यांच्यापासून दूर झालो. तेव्हापासून आजतागायत त्यांना भेटलो नाही,' असे शेट्टी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत विधान परिषदेच्या जागेवरून झालेल्या नाराजी नाट्यावर बोलताना शेट्टी म्हणाले,"आम्हाला विधान परिषद देण्याचा शब्द लोकसभा निवडणुकीच्या काळात दिला होता. आम्हाला विधानसभेच्या दोन जागा दिल्या; पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला. मला स्वतःला विधान परिषदेवर जायची इच्छा नव्हती. मात्र, राज्यपालांनी अतिशय काटेकोरपणे नियम लावल्याने इतर कोणी दिल्यास निवड होण्यात अडथळे निर्माण होतील; म्हणून शरद पवार यांनी मी संधी स्वीकारावी, असे सांगितले. हा निर्णय आम्ही संघटनेच्या बैठकीत घेतला होता, पण नंतर काही सहकारी नाराज झाले. मग मी विचार केला, एका पदामुळे जर आयुष्याची मैत्री तुटत असेल तर मग ते पदच नको. पण त्यानंतर आमच्यातील गैरसमज दूर झाले,' असे शेट्टी म्हणाले. 

राजू शेट्टी म्हणाले,"मला राज्याच्या राजकारणात रस नाही. लोकसभा हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे सभागृह आहे. मला पुन्हा लोकसभेत जायचे आहे. पण, सध्या राज्यात जाती जातीमध्ये, धर्मा-धर्मामध्ये भांडणे लावली जात आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. हे रोखायला हवे. म्हणून मी राज्यात थांबून काम करणार आहे. आज प्रतिगामी शक्तींकडून लोकशाहीला धोका आहे, त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com