नीलमताईंनी चंद्रकांतदादांना आव्हान देणे हास्यास्पद - संदीप खर्डेकर - Pune BJP Leader Challenge Neelam Gorhe | Politics Marathi News - Sarkarnama

नीलमताईंनी चंद्रकांतदादांना आव्हान देणे हास्यास्पद - संदीप खर्डेकर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

चंद्रकांतदादा पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील आणि राज्यातील सर्वमान्य नेते आहेत - सातत्याने मागच्या दाराने विधानपरिषदेत प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या नीलमताई गोऱ्हे यांनी दादां वर टीका करताना किमान आपली पूर्वपीठिका तपासून पाहणे गरजेचे वाटते, अशी टीका पुणे भाजपचे मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली.

पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत ५ जिल्ह्यातील मतदार मतदान करत असतात,पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा ,कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे अश्या ५ जिल्ह्यातून पदवीधर ची निवडणूक लढवून दोन वेळा विजयी झालेले चंद्रकांतदादा पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील आणि राज्यातील सर्वमान्य नेते आहेत - सातत्याने मागच्या दाराने विधानपरिषदेत प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या नीलमताई गोऱ्हे यांनी दादां वर टीका करताना किमान आपली पूर्वपीठिका तपासून पाहणे गरजेचे वाटते, अशी टीका पुणे भाजपचे मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली.

भारतीय जनता पार्टीचे नेते रोजच सरकारवर टीका करीत आहेत.राज्य सरकार सक्षम आहे. सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता आणखी वाढत आहे. राम कदम यांच्यासारखे लोकही टीका करीत आहेत. हिंमत असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेच्या प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल दिले होते. 

त्याला उत्तर देताना खर्डेकर म्हणाले, "मी या निवेदनाद्वारे नीलमताईंच्या निदर्शनास आणून देउ इच्छितो की  चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मधून मनसे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त शक्तीला (?) तोंड देउन बहुमताने निवडून आले आहेत.त्यांच्या पराभवासाठी जाणत्या राजां सह राज्यातील अनेक नेते जीवाचे रान करत होते - तरीही चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी  लक्षणीय विजय नोंदविला. त्यामुळे चंद्रकांतदादां ना कोथरूड मधून पुन्हा निवडून येउन दाखवा असे आव्हान देताना नीलमताई स्वतः जनतेतून कधी निवडणूक लढविणार हे त्यांनी स्पष्ट करावे आणि मग सलग तीन वेळा जनतेतून निवडून आलेल्या चंद्रकांतदादांना आव्हान द्यावे,''

''नीलमताईं नी दरबारी राजकारण सोडावे आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी अभाविप च्या प्रचारक पदापासून आजपर्यंत जो कार्यकर्त्यांचा मोहोळ उभा केला आहे त्याचा आदर्श घ्यावा आणि जनतेत काम करावे - नपेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलां वरील अत्याचारात झालेली वाढ याबाबतीत आत्मपरीक्षण करावे आणि या सरकारच्या काळात महिलांना जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या नराधमांना कायद्याची भीती राहिलेली नाही याबाबतीत आंदोलन उभारावे,'' असेही संदीप खर्डेकर म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख