Prithviraj Jachak's journey towards NCP | Sarkarnama

पवारांविरोधात लोकसभा लढलेले पृथ्वीराज जाचक राष्ट्रवादीच्या गोटात 

मिलिंद संगई, राजकुमार थोरात 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष आणि सहकारातील दिग्गज पृथ्वीराज जाचक हे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यापासून दुरावले होते. पण, तेच जाचक आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. 

बारामती : राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष आणि सहकारातील दिग्गज पृथ्वीराज जाचक हे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यापासून दुरावले होते. पण, तेच जाचक आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाचक यांनी पवारांसमवेत दुपारचे जेवण घेतले. गेल्या काही महिन्यांपासून जाचक यांना पवारांसोबत आणण्यासाठी प्रयत्न करणारे बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी चालवलेली मोहीम अखेर सोमवारी (ता. 3 ऑगस्ट) दुपारी यशस्वी झाली आणि जाचक यांनी अजित पवार यांच्यासमवेत काम करण्याचे जाहीर केले. 

शरद पवार व पृथ्वीराज जाचक यांच्यात मुंबईत सोमवारी सविस्तर चर्चा झाली. किरण गुजर हेही या प्रसंगी उपस्थित होते. छत्रपती सहकारी साखर कारखान्यात आपल्याला डावलले जात असल्याच्या भावनेतून जाचक यांनी पवारांसोबत काडीमोड घेत वेगळी चूल मांडली होती. 

हा विरोध इतका टोकाचा बनला होता की पृथ्वीराज जाचक यांनी थेट लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनाच आव्हान दिले होते. मात्र, कालांतराने राजकीय स्थिती बदलली. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जाचक यांचा विरोध कायम होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आणि पृथ्वीराज जाचक यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. शरद पवार यांनीही आज त्याला हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे जाचक आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात पवार कुटुंबीयांसोबत असतील, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

"छत्रपती'साठी अजित पवार-पृथ्वीराज जाचक एकत्र लढणार 

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदासाठी माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर आजपासून (ता. 3 ऑगस्ट) एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात महत्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली. 

नीरा खोऱ्यातील महत्वाच्या सहकारी कारखान्यांत भवानीनगरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा समावेश होतो. कारखान्यावर बारामती व इंदापूर तालुक्‍यातील सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त सभासदांचे संसार चालत आहेत. सध्या कारखाना अडचणीत असून जाचक हे शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून छत्रपती कारखान्याच्या सभासदांच्या व कामगारांच्या हितासाठी लढत आहे. 

गेल्या एक-दीड महिन्यापासून जाचक राष्ट्रवादीमध्ये स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. रक्षाबंधनाच्या मुर्हूतावर आज राष्ट्रवादीचे किरण गुजर यांनी पुढाकार घेऊन जाचक व शरद पवार यांची भेट घडवून आणली. सुमारे दीड तासाची डिनर डिप्लोमासी झाली. या वेळी जाचक यांचे पुत्र व उद्योजक कुणाल जाचक ही उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या हितासाठी, तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे हित डोळ्यासमोर ठेवून आगामी काळात अजित पवार यांच्यासमवेत कार्यरत राहणार असल्याचे जाचक यांनी स्पष्ट केले आहे. 

याबाबत गुजर यांनी सांगितले की, ही नियोजित बैठक होती. सभासदांच्या हितासाठी पृथ्वीराज जाचक यांनी शरद पवार यांच्यासमवेत काम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पवारांनी त्याला हिरवा कंदील दाखविला आहे.  

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख