Breaking पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दोन जण पुणे पोलिसांच्या ताब्यात - Police Arrest two in Pooja Chavan Death Case | Politics Marathi News - Sarkarnama

Breaking पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दोन जण पुणे पोलिसांच्या ताब्यात

सागर आव्हाड
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

टीक टाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या दोघांपैकी एकजण अरुण राठोड यांचा निकटवर्तीय असल्याचे समजते. या प्रकरणात अरुण राठोड हा फरारी आहे. 

पुणे : टीक टाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या दोघांपैकी एकजण अरुण राठोड यांचा निकटवर्तीय असल्याचे समजते. या प्रकरणात अरुण राठोड हा फरारी आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा चव्हाण  प्रकरणाचा तपास करण्यासाठी यवतमाळ आणि परळीत गेलेल्या पोलिसांच्या पथकाने या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अरुण राठोडला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

पोलिस योग्यप्रकारे तपास करत नसल्याचे आरोपही विरोधकांनी केले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून पुणे पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राज्याच्या पोलिस महासंचालकांचेही या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांकडून यवतमाळमध्येही याप्रकरणाचे धागेदोरे शोधले जात आहेत. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणात प्रमुख माहीतगार असलेला अरूण राठोड याचा शोध पोलिस घेत आहेत. या मृत्यू प्रकरणामध्ये कथित मंत्र्यासोबत राठोडचा संवाद असल्याने तो एकदम झोतात आला आहे. अरुण राठोड याच्याशी बोलतानाच संबंधित मंत्री पूजाचा मोबाईल ताब्यात घेण्याच्या सूचना करताना ऐकू येत होते. पोलिसांनी त्याचा जबाब घेतला असून त्याच्या जबाबात पूजाने मद्य प्राशन केल्याचे म्हटले होते. त्याच्या मोबाईलमधील सर्व आॅडिओ क्लिप एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने घेऊन त्या व्हायरल केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणातील गंभीरपणा अनेकांच्या लक्षात आला. तो वनखात्याचा कर्मचारी असल्याचेही बोलले जाते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख