पुणे : ''मी ससूनमधून आरएमओ (वैद्यकीय अधिकारी) बोलतोय. तुमच्या रुग्णावर उपचारासाठी औषधांची गरज असून त्यासाठी तातडीने अॉनलाईन पैसे पाठवा...'' असे फोनवरून सांगत ससून रुग्णालयातील रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून 50 हजार रुपये लुबाडले असून आणखी काही रुग्णांच्या नातेवाईंकाना असेच फोन आल्याचे समजते. या बोगस डॉक्टरचा बंडगार्डन पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
ससून रुग्णालयात राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचा यामध्ये समावेश असतो. रुग्णालयामध्ये बहुतेक उपचार मोफत केले जातात. तसेच काही शस्त्रक्रिया, तपासण्या व उपचारांचा खर्चही अत्यंत कमी असतो. रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर होणारे उपचारही मोफत असतात. त्यामुळे गरजू रुग्णांचा ओढा ससून रुग्णालयाकडे असतो. पण या रुग्णांना लुटण्याचाच प्रकार समोर आला आहे.
रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाईकांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यांनी आपली ओळख रुग्णालयातील डॉक्टर असल्याची सांगितली. तुमच्या रुग्णावर उपचारासाठी औषधांची गरज असून त्यासाठी तातडीने अॉनलाईन पैसे पाठवा असे सांगितले. संबंधितांनी त्यावर विश्वास ठेवून जवळपास 50 हजार रुपये पाठविले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
औषधांसाठी पैसे पाठविण्याची मागणी करणारे फोन आणखी काही जणांना आल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाकडे आजच तक्रार करण्यात आली आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाला इंजेक्शनसाठी सात हजार रुपये गुगल पेद्वारे पाठविण्यास सांगण्यात आले. संबंधित नातेवाईकांनी परिचारिकांकडे याबाबत विचारले असता त्यांनी असे कोणतेही इंजेक्शन लागत नसल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने आरएमओ देशपांडे अशी आपली ओळख सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रुग्णालयातील एका डॉक्टरांच्या नातेवाईकांनाही असाच फोन आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना औषधांसाठी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. संबंधित नातेवाईकाने याबाबत माझ्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा बोगस डॉक्टर असल्याचे समजले. या बोगस डॉक्टरमुळे ससून रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. असे फोन आणखी किती जणांना करण्यात आले आहेत, याबाबत माहिती नाही. नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतरच हा प्रकार समोर येत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून पैसे पाठविण्यास सांगितल्यास त्यांची तक्रार करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
... असे मिळविले जातात मोबाईल क्रमांक
रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक मिळविण्यासाठी संबंधित वॉर्डात फोन केला जातो. आरएमओ बोलतोय असे सांगून परिचारिकांकडून रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईंकांचे मोबाईल क्रमांक मागितले जातात. आरएमओचा फोन असल्याने परिचारिकाही माहिती देतात. त्यानंतर मग संबंधित बोगस डॉक्टर नातेवाईकांना फोन करून पैसे पाठविण्यास सांगतात.

