पडळकर तो विषय सोडून धनगर आरक्षणावर बोलले 

पंढरपुरात पंधरा दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे प्रसार माध्यमांपासून दूर होते. ज्या दिवशी त्यांनी पवारांवर टीका केली, त्याच दिवशी सोलापुरात असलेले देवेंद्र फडणवीस यांनी 'पडळकरांना याबाबत समज दिली असून ते लवकरच याचा खुलासा करतील,' असे सांगितले होते.
Padalkar left the subject and spoke on Dhangar reservation
Padalkar left the subject and spoke on Dhangar reservation

पुणे : पंढरपुरात पंधरा दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे प्रसार माध्यमांपासून दूर होते. ज्या दिवशी त्यांनी पवारांवर टीका केली, त्याच दिवशी सोलापुरात असलेले देवेंद्र फडणवीस यांनी "पडळकरांना याबाबत समज दिली असून ते लवकरच याचा खुलासा करतील,' असे सांगितले होते. मात्र, पंधरा दिवसानंतरही त्यांनी याबाबत अवाक्षरही काढले नाही. "सरकारनामा'ने आज (ता. 9 जुलै) पडळकरांशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी पवारांवरील टिकेचा विषय सोडून धनगर आरक्षणावर बोलणे पसंत केले. 

ते म्हणाले की धनगर आरक्षण आणि समाजाच्या अन्य मागण्यासांठी कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मात्र, त्याआधी धनगर समाजासाठी फडणवीस सरकारने दिलेल्या सर्व सवलती या सरकारने सुरू कराव्यात. हरियाना सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जातीसाठी देण्यात येणाऱ्या सर्व सवलती देण्यासंदर्भातील निर्णय दोन दिवसांपूर्वी काढला आहे. महाराष्ट्र सरकारनेदेखील त्या सर्व सुविधा राज्यातील धनगर समाजाला द्याव्यात, अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे. 

शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पडळकर यांच्यावर राज्यभरातून चौफेर टीका झाली होती. त्यानंतर प्रथमच पडळकर यांनी "सरकारनामा'शी संवाद साधला. ते म्हणाले की, "गेल्या पाच वर्षांत विरोधात असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलने केली. आता सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाच्या कोणत्याच प्रश्‍नावर बोलायला हे सरकार तयार नाही. धनगर आणि धनगड या दोन्ही जाती एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात सादर केले आहे. न्यायालयीन लढा सुरूच राहील, मात्र, तोपर्यंत फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी दिलेल्या सर्व योजना आणि सवलती या सरकारने दिल्या पाहिजेत.' 

धनगर समाजासाठी 10 हजार घरे, विद्यार्थ्यांची वसतिगृहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलती, अशी एक हजार कोटी रुपयांची योजना जाहीर केली होती. त्यावर कामदेखील सुरू होते. मात्र, या सरकारने यातील काहीच केलेले नाही. आधीच्या सरकारच्या सर्व योजना बंद केल्या आहेत. सरकारने सर्व योजना व सवलती तातडीने सुरू कराव्यात; अन्यथा या सरकारच्या विरोधात राज्यातील धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी फडणवीस सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही; तोपर्यंत इतर माध्यमातून जास्तीत जास्त सवलती देण्याचा प्रयत्न त्या सरकारने केला. मात्र, सत्तेत येण्याआधी पिवळे फेटे बांधून आंदोलन करणारे हे सरकार आता सारे काही विसरून गेले असल्याची टीका आमदार पडळकर यांनी केली. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजासाठी अनेक गोष्टी करता येणे शक्‍य आहे. मात्र, या सरकारला धनगर समाजासाठी काहीच करण्याची इच्छाशक्ती नाही, अशी टीका त्यांनी केली. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com