पुणे : माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या एका संचालकाचे अपहरण करत त्यांना सदाशिव पेठेतील एका फ्लॅटवर नेहून डांबून ठेवत गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
तर खंडणीस्वरूपात ५ लाख घेत जळगावला जाऊन संस्थेची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात महाजन तसेच तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय पाटील (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे.रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जळगाव येथील असून, ते वकिल आहेत. ते जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. दरम्यान त्यांना संशयित आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना एका गाडीत जबरदस्तीने बसवून सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी त्यांचे हात-पाय बांधून डांबून ठेवले. यानंतर त्यांना मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्याला देखील त्यांनी याठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी घेतली, असा आरोप असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या संशयित आरोपींनी जळगाव येथे जाऊन संस्थेत घुसून तोडफोड केली व आपल्या खिशातील पैसे आणि सोन्याचे दागिने लुटले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा दाखल केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण हे तपास करत आहेत.
Edited By - Amit Golwalkar

