अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने पुण्यात कोरोना वाढतोय : खासदार बापट - No Coordination Between Pune Officials Allege MP Girish Bapat | Politics Marathi News - Sarkarnama

अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने पुण्यात कोरोना वाढतोय : खासदार बापट

उमेश घोंगडे 
शुक्रवार, 22 मे 2020

पुण्यात आधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय तसेच या संकटाचा मुकाबला करण्यात अडचणी येत असल्याचा आरोप खासदार बापट यांनी केला.

पुणे : कोरोनाच्या संकटात हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. त्यांना घर चालविणे अवघड झाले आहे. या काळात त्यांना मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारने सलून लॉन्ड्री व रिक्षावाले या व्यावसायिकाना तातडीने १० हजार रूपयांची मदत केली पाहिजे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज केली. पुण्यात आधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय तसेच या संकटाचा मुकाबला करण्यात अडचणी येत असल्याचा आरोप खासदार बापट यांनी केला.

राज्य सरकारच्या विरोधात पुण्यात भाजपा शहर कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर ते बोलत होते. खासदार बापट म्हणाले, ''दोन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याचे सलून, लॉड्री व रिक्षाचालकांचा हाल होत आहत. या साऱ्यांचे हातावर पोट आहे. दीर्घकाळ व्यवसाय बंद असल्याचे त्यांचे संसार चालविणे अवघड झाले आहे. पुण्यात अजूनही परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना तातडीने प्रत्येकी दहा हजार रूपयांची मदत सरकारने केली पाहिजे. पुण्यात ५० हजार रिक्षा चालक आहेत. सुमारे आठ ते दहा हजार लॉन्ड्री व्यावसायिक आहेत.त्यांना तातडीने मदत झाली पाहिजे,''

प्रशासनाने राजकीय कार्यकर्त्यांचा वापर करुन घ्यावा

बापट पुढे म्हणाले, "पुण्यात सुरवातीपासूनच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांमध्ये समन्वय नाही. परिणामी कोरोनाचा मुकाबला करण्यात एकवाक्यता नाही.एकाने एक निर्णय घेतला तर दुसऱ्यादिवशी त्यात बदल झालेला असतो. त्यातून उपाययोजना व्यापकपणे राबविणे शक्य होत नाही.या साऱ्या गोंधळामुळे पुण्यातील जनता भयभीत आहे. राजकीय कार्यकर्त्यांना या निर्णय व अंमलबजावणीच्या प्रक्रियेत सामावून घेण्याची गरज आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या पाठीशी अनुभव असतो. परिसराची माहिती, सामान्य लोकांशी संपर्क असतो. त्याचा उपयोग प्रशासनाने करून घेण्याची गरज आहे. या संदर्भात विचार करण्यासाठी बैठक घ्यावी अशी मागणी करणारे पत्र पालकमंत्री अजित पवार यांना दिले आहे.''

राज्य सरकारने काहीच केले नाही

''केंद्र सरकारने अन्नधान्यापासून थेट खात्यात निधी जमा करण्यापर्यंत अनेक गोष्टीत मदत केलेली आहे. राज्य सरकार काहीच करायला तयार नाही. राज्यात कोरोनाबाधीत होण्याचा आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. सरकारने योग्य काम केले. आम्ही सुचविलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली तर सहकार्याची भाजपाची तयारी आहे. आम्ही राजकारण करत नाही. कोरोनाची लागण रोखली जावी, यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ त्यासाठी आज आंदोलन करावे लागले,'' असे खासदार बापट यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख