NCP's Umesh Patil is also interested from Pune graduate constituency | Sarkarnama

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेश पाटीलही इच्छुक 

महेश जगताप 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सर्व पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यातही राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा मतदारसंघ होमपीच आहे. त्यामुळे साहजिकच या पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे.

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड, पक्ष प्रवक्ते उमेश पाटील त्याच बरोबर इतिहास अभ्यासक व मराठा संघटनांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे श्रीमंत कोकाटे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात उमेदवारीसाठी या तिघांमध्ये सध्या तरी सामना दिसत आहे. 

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सर्व पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यातही राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा मतदारसंघ होमपीच आहे. त्यामुळे साहजिकच या पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे.

सध्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी उमेश पाटील (नरखेड, ता. मोहोळ, सोलापूर), इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे (वाकाव, ता. माढा, सोलापूर), मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील (अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), अरुण लाड (कुंडल, जि. सांगली) हे प्रबळ दावेदार आहेत. लाड यांनी मागील निवडणूक अपक्ष लढविली असून त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 

राज्याच्या राजकारणात पुणे पदवीधर मतदारसंघ हा पॉवरफुल्ल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले पुणे तसेच, महाराष्ट्रात समृद्ध परिसर म्हणून ओळख असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व पुणे या पाच जिल्ह्यांचा या मतदारसंघात समावेश होतो.

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. मात्र, चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून निवडून आल्याने गेली सात ते आठ महिने ही जागा रिक्त आहे. 

लाड यांनी गत निवडणुकीत बंडखोरी केल्याने चंद्रकांत पाटील यांचा निसटता विजय झाला होता. त्यामुळे लाड यांना पुन्हा उमेदवारी मिळते उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे की बाळराजे पाटील यांना उमेदवारी मिळते, हे पाहावे लागेल. 

उमेश पाटील "सरकारनामा'शी बोलताना म्हणाले की उमेदवारीसाठी मी जरी इच्छुक असलो तरी पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. पक्षाचे काम निष्ठने करणार आहे. 

राज्यभर विणलेले वैचारिक जाळे आणि पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत अनेक दौरे करून पदवीधरांचे अनेक प्रश्‍न समजून घेऊन ते सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यामुळे पक्ष निश्‍चित दखल घेऊन संधी देईल, असे कोकाटे यांनी सांगितले. 

सर्व इच्छुकांकडून उमेदवारीबाबत दावे करत असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कोणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडणार हे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख