राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष  

आमच्या दुसऱ्या हातात राजे उमाजी नाईक यांची कुऱ्हाड आहे.
NCP is a party of sugar millers, bankers and industrialists : Praveen Darekar
NCP is a party of sugar millers, bankers and industrialists : Praveen Darekar

शिरूर : ‘‘गरिबांना, छोट्या कार्यकर्त्यांना न्याय, ताकद आणि सत्ता देण्याचे काम भारतीय जनता पक्षच करू शकतो. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरिबांकडे बघायला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. तो सुभेदार, साखर कारखानदार, बँकवाले, उद्योगपतींचा पक्ष आहे. भाजप मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,’’ अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. (NCP is a party of sugar millers, bankers and industrialists : Praveen Darekar)

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेने आयोजिलेल्या राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात दरेकर बोलत होते. राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व दीपप्रज्ज्वलनाने त्यांनी या मेळाव्याचे उद्‌घाटन केले. ते म्हणाले की राज्यातील रामोशी बांधवांसह बहुजन समाजाने, महाविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार पेटवावा. भारतीय जनता पक्ष या विद्रोहाच्या बळावर या नाकर्त्या लोकांची सत्ता उलथवून टाकेल. आमच्या हातात कमळ आहे, म्हणून आम्हाला कमजोर समजणारांनी आता हे ध्यानात घ्यावे की आमच्या दुसऱ्या हातात राजे उमाजी नाईक यांची कुऱ्हाड आहे. त्यातून आम्ही अन्यायी राजवटीवर घाव घालणारच.

भाजपचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी तयार केलेल्या घटनेनुसार, वंचित आणि उपेक्षितांच्या कल्याणाचे भाजपचे धोरण आहे, असे सांगून दरेकर म्हणाले, ‘‘सामाजिक विचारधारेतील शेवटचा माणूस, अंतिम घटक केंद्रबिंदू मानून त्याच्या उद्धाराचे भाजपचे धोरण आहे. या बहुजन घटकांच्या उत्कर्षालाच पक्षाचे प्राधान्य असते. पण सद्यःस्थितीत राज्यातील सरकारकडून सामान्य समाजाची उपेक्षा चालू आहे. रामोशी समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या योजना गुंडाळल्या, समाजाच्या कल्याणकारी योजनांवरील निधी रोखला. बहुजन समाजाचे, तळागाळातील घटकांचे, शेतकरी, कामगार, बेरोजगार, महिला सुरक्षेचे काहीही देणेघेणे नसलेल्या सरकारला फक्त आपली सत्ता कशी टिकेल एवढीच चिंता आहे. असे स्वार्थी, चिंतातूर सरकार खाली खेचणे हे समाजाचे कर्तव्य आहे.'' 

देशातील राजेरजवाडे ज्यावेळी ब्रिटिशांचे मांडलिकत्व पत्करत होते, तेव्हा पुरंदरच्या जंगलातून राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध रण पेटविले. या आद्यक्रांतीवीराचे कर्तृत्व समाजासमोर यायला वेळ लागला. अवघ्या 41 वर्षांच्या कारकिर्दीत धाडस, दरारा काय असतो हे त्यांनी दाखवून दिले. देशासाठी बलिदान दिलेल्या या क्रांतिकारकांचे नाव इंग्रजांनी दरोडेखोरांच्या यादीत टाकले. साठ वर्षात ते काढण्याचे काम सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांचा राष्ट्रपुरूषाचा दर्जा देताना त्यांची शासकीय जयंती सुरू केली. राजे उमाजींचा समग्र इतिहास समाजासमोर येणे गरजेचे आहे, असेही दरेकर म्हणाले. 

या वेळी उमाजी नाईक यांचे सातवे वंशज रमण खोमणे यांचा संघटनेच्या वतीने कुऱ्हाड व घोंगडी देऊन सन्मान करण्यात आला. जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माळशिरसचे आमदार राम सातपुते, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संपर्क प्रमुख ऍड. धर्मेंद्र खांडरे; तसेच जय मल्हार क्रांती संघटनेचे रामदास धनवटे, अंकुश जाधव, संजय जाधव, रोहिदास मदने, बाळनाना जाधव हे राज्यस्तरीय नेते उपस्थित होते. 

जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. अविनाश जाधव यांनी प्रास्ताविकात राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला. श्रीकांत रेणके व सहकाऱ्यांनी उमाजी नाईकांवर पोवाडा सादर केला. रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी आभार मानले. 

आमदार अशोक पवारांवर टीकेचा भडिमार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ऍड. अशोक पवार यांच्यावर या मेळाव्यात सर्वच वक्‍त्यांनी टीका केली. दौलत शितोळे यांनी त्यांच्यावर खुनशी राजकारणाचे आरोप केले. मंगलदास बांदल, रामभाऊ सासवडे, संदीप भोंडवे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविले असून, माझ्याही व्यावसायिक, राजकीय, सामाजिक वाटचालीत ते आडवे येत आहेत. पण अन्याय सहन न करणाऱ्या जातीत मी जन्माला आलो असून लढणे ही माझी परंपरा आहे, त्यामुळे मला आडवे आलेल्यांना आडवे करण्याची धमक माझ्यात आहे, असा इशारा त्यांनी दिला. 

राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून घातकी राजकारण करून संघटनेत फूट पाडण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोप, संजय जाधव यांनी केला. समाजबांधवांवर अन्याय, अत्याचार झाल्यास राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींचा राजकीय वध अटळ आहे, असे गणेश भेगडे म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास महाविकास आघाडीची शकले उडतील, असे योगेश टिळेकर म्हणाले. भाजपची पुन्हा जोरदार बांधणी सुरू झाली असून, शिरूरचा पुढील आमदार भाजपचाच असेल असा विश्‍वास दरेकर यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com