NCP MP Dr. Amol Kolhe Quarantined Himself at Home | Sarkarnama

खासदार डाॅ. अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाईन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जुलै 2020

एक जून ते चार जून या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणाऱ्या खासदार डॉ. कोल्हे यांचा या दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. ही बातमी समजल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी तत्काळ स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे.

पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समजल्यानंतर कार्यक्रमांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन झाले आहेत. 

एक जून ते चार जून या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणाऱ्या खासदार डॉ. कोल्हे यांचा या दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. ही बातमी समजल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी तत्काळ स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

डॉ. कोल्हे सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर येतात. त्यावेळी काही वेळा कार्यक्रमांदरम्यान नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत. अशा स्थितीत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून त्यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तीन विद्यमान आमदार, एक माजी आमदार आणि पुण्याचे महापौर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, दौंडचे आमदार राहुल कुल, कसब्याच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक, हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. दरम्यान, यातील लांडगे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर कुल आणि टिळक यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल कालच (ता. ७ जुलै) आला आहे. टिळेकर आणि मोहोळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

गेल्या आठवड्यापासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना संसर्ग झाल्याने उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांचा मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख