....म्हणून आमदार भालके यांनी थोपटले होते दंड! 

सुधाकर परिचारकांच्या विरोधात आमदार भालकेयांनी थोपटलेल्या दंडाची त्यावेळी राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती. मी त्यावेळी दंड का थोपटले होते. याचा आमदार भालके यांनी "सरकारनामा'शी बोलताना गौप्यस्फोट केला.
MLA Bhalke gave an answer to Sudhakar Paricharak that incident
MLA Bhalke gave an answer to Sudhakar Paricharak that incident

पंढरपूर : गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांनी हॅट्‌ट्रीक साधत भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यावेळी आमदार भालके यांची पंढरपूर शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. त्यावेळी भालके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याच वेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर दंड थोपटून 25 वर्षांपूर्वीच्या अपमानास्पद राजकीय घटनेचा वचपा काढल्याचे सूचित केले होते. 

पराभूत उमेदवार सुधाकर परिचारकांच्या विरोधात आमदार भालकेंनी थोपटलेल्या दंडाची त्यावेळी राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती. मी त्यावेळी दंड का थोपटले होते. याचा आमदार भालके यांनी "सरकारनामा'शी बोलताना गौप्यस्फोट केला. सुमारे 25 वर्षांपूर्वी घडलेल्या या राजकीय घटनेचा या निमित्ताने उलगडा केला. 

पंढरपूरच्या राजकारणाला मोठा इतिहास 

या विषयी सांगताना आमदार भालके म्हणाले, पंढरपूरच्या राजकारणाला मोठा इतिहास आहे. महाष्ट्राच्या विधानसभेत पंढरपूरचे प्रतिनिधीत्व करण्याचे भाग्य (कै). बाबुराव जोशी, भाई राऊळांपासून ते माझ्यापर्यंत अनेकांना मिळाले. यामध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक आणि (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांनी पंढरपूरचे सर्वाधिक काळ प्रतिनिधीत्व केले. सुधाकर परिचारक हे 1985 ते 2009 पर्यंत सलग 25 वर्षे आमदार होते. 

भालकेंची हॅट्‌ट्रीक 

सन 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने परिचारकांच्या राजकीय वर्चस्वाला हादरा देत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून मी विजय मिळवला. त्यानंतर 2014 मध्ये प्रशांत परिचारक आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा थेट पराभव करुन हॅटट्रीक केली. 

औदुंबरअण्णा अडकले कात्रीत 

जिल्ह्याच्या राजकारणात (कै.) शंकरराव मोहिते पाटील आणि (कै.) नामदेव जगताप असे दोन मातब्बर गट होते. औदुंबरअण्णा पाटील हे नामदेव जगताप गटाचे, तर माजी आमदार सुधाकर परिचारक हे मोहिते पाटील गटाचे होते. पंढरपूरमध्ये पाटील आणि परिचारक असे दोन मातब्बर गट सक्रीय होते. औदुंबर पाटील यांच्या नंतर त्याचे पुत्र राजाभाऊ पाटील यांनी 1995 मध्ये कॉंग्रेस पक्षात बंडखोरी करत कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी औदुंबरअण्णा पाटील हे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. एकीकडे मुलाची बंडखोरी, तर दुसरीकडे पक्षशिस्त अशा कात्रीत अण्णा अडकले होते. 

अण्णांवर पुत्रप्रेमाचा आरोप 

राजकीय तत्वनिष्ठ आणि शरद पवारांवर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या औदुंबरअण्णा पाटील यांनी पक्षनिष्ठा म्हणून स्वतःच्या मुलाच्या विरोधात कॉंग्रेसचे उमेदवार असलेले सुधाकर परिचारकांचा प्रचार केला होता. त्यावेळी औदुंबरअण्णा घरी शांत बसले असते तरी त्यांचा मुलगा राजाभाऊ पाटील हे सहज निवडून आले असते अशी, त्यावेळची राजकीय परिस्थिती होती. परंतु त्यांनी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून परिचारकांचे काम केले. परिचारकांना निवडून आणण्यात औदुंबरअण्णा पाटील यांचा मोठा वाटा होता. तरीही औदुंबरअण्णा पाटील यांच्यावर परिचारकांनी पुत्रप्रेमाचा आरोप केला होता. 

परिचारकांची खोचक टिप्पणी

निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार सुधाकर परिचारक हे शरद पवारांना भेटण्यास मुंबईला गेले होते. त्यावेळी त्यांनी भेटीदरम्यान शरद पवारांसमोरच शड्डू मारत, "तुमच्या राजाभाऊला पाडून आलोय,' अशी खोचक टिप्पणी केली होती. परिचारकांची ही खोचक टिप्पणी औदुंबरअण्णा पाटलांसह  कार्यकर्त्यांना असह्य झाली होती. तेव्हापासून 1995 ते 2019 पर्यंत पाटील विरुद्ध परिचारक या दोन गटांत निवडणुका झाल्या आहेत. 

अण्णांचा राजकीय वारसदार होण्याचे भाग्य 

सन 2009 मध्ये पहिल्यांदा औदुंबरअण्णा पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून मला पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील जनतेने निवडून दिले. सन 2014 मध्ये प्रशांत परिचारकांचा, तर 2019 मध्ये सुधाकर परिचारकांचा पराभव केला. सुमारे 25 वर्षांपूर्वी पाटील यांच्या मुलाचा पराभव केला; म्हणून शरद पवारांसमोर शड्डू ठोकणाऱ्या परिचारकांचा पराभव केल्यानंतर मी शिवाजी चौकात परिचारकांच्या विरोधात दंड थोपटले होते. 

तो शड्डू आमच्या जिव्हारी 

मी थंड थोपटल्याची माहिती शरद पवारांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी मला विचारले, "भारत तू शिवाजी चौकात थंड थोपटले. मी म्हणालो होय साहेब, सुमारे 25 वर्षांपूर्वी याच सुधाकर परिचारकांनी तुमच्या समोर राजाभाऊ पाटील यांचा पराभव केला म्हणून शड्डू ठोकला होता. तो शड्डू आमच्या जिव्हारी लागला होता. त्याची परतफेड म्हणून मीही थंड थोपटले. त्यावर पवार यांनी स्मितहास्य केले. असेही आमदार भारत भालके यांनी या वेळी सांगितले. 

आमदार भालके यांनी प्रथमच थंड थोपटलेल्या घटनेचा उलगडा केला आहे. त्याचे विरोधी परिचारक गटातून कसे पडसाद उमटतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com