माउलींच्या पादुका शिवशाही बसमधून जाणार पंढरीला 

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका पंढरपूरला आषाढी वारीसाठी आषाढ शुद्ध दशमीला म्हणजेच 30 जून रोजी शिवनेरी बसद्वारे पोलिस बंदोबस्तात नेण्यात येणार आहेत. या पालखीसोबत वीस व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे.
माउलींच्या पादुका शिवशाही बसमधून जाणार पंढरीला 
Mauli's paduka will go to Pandhari from Shivshahi bus:

आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका पंढरपूरला आषाढी वारीसाठी आषाढ शुद्ध दशमीला म्हणजेच 30 जून रोजी शिवनेरी बसद्वारे पोलिस बंदोबस्तात नेण्यात येणार आहेत. या पालखीसोबत वीस व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. 

आळंदी देवस्थान समितीला राज्य सरकारकडून याबाबतची माहिती पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबतचे पत्र देवस्थान समितीला दिले आहे. या पादुका ने-आण करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर असणार आहे. 

पालखी सोहळ्यात लाखो लोक एकत्र येतात. पालखीतील सहभागी लोकांना कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणारा पालखी सोहळा यंदा राज्य सरकारने रद्द केला होता. संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची जबाबदारी सरकारची आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार माउलींच्या पादुका शिवशाही बसद्वारे पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. 

देहू येथे ज्येष्ठ वद्य सप्तमीला (ता. 12 जून) जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा, तर आळंदीत माउलींच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. 13 जून) राज्य सरकारच्या आदेशानुसार मोजक्‍या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर तुकोबांच्या पादुका देहूत, तर माउलींच्या पादुका आळंदी येथे ठेवण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, एक जुलै रोजी आषाढी एकादशी असून संतांच्या पादुका पंढरपुरात पांडुरंगाच्या भेटीसाठी येत असतात. दरवर्षी संतांच्या पालख्या पायी पंढरपूला जात असतात. या वर्षी या पादुका शिवशाही बसच्या माध्यमातून नेण्यात येणार आहेत. या पादुकांसोबत जास्तीत जास्त वीस व्यक्तींना राहता येणार आहे. तसे बंधन राज्य सरकारने घातले आहे. या पादुकांसोबत पोलिस बंदोबस्तही असणार आहे. 

दरम्यान, संतांच्या पादुकांसोबत साठ वर्षांपेक्षा अधिक वयाची व्यक्ती नसावी. पादुकांसोबत जाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार नसावा. पादुकांसोबत येणाऱ्या व्यक्तींची कोरोना तपासणीही करण्यात येणार आहे. 

उपजिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांनाही पालखीसोबत जावे लागणार आहे. त्यांच्यावर पादुका पंढरपूरला नेणे आणि पुन्हा आळंदीला आणण्याची जबाबदारी असणार आहे. प्रवासात पादुका कोठेही थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यास पत्रातून सांगण्यात आले आहे. शिवशाही बस तीस जून रोजी सायंकाळी सहापर्यंत पादुका पंढरपूरला पोच करणार आहे. 

सरकारकडून आलेल्या पत्रानंतर आळंदी देवस्थानने पंढरपुरातील आषाढी एकादशी (ता. 1 जुलै) सोहळ्याला जाण्याची तयारी सुरू केली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in