संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांतारामबापू कुंजीर यांचे निधन

मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रडचे कार्याध्यक्ष शांतारामबापू कुंजीर (वय ५५) यांचे पहाटे आज निधन झाले. त्यांना काल रात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Maratha Leader Shantaram Kunjir Died in Private Hospital at Pune
Maratha Leader Shantaram Kunjir Died in Private Hospital at Pune

पुणे : मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रडचे कार्याध्यक्ष  शांतारामबापू कुंजीर (वय ५५) यांचे पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने  निधन झाले.  त्यांना काल रात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  मात्र, उपचारादरम्यान कुंजीर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी ,एक मुलगा, सून, मुलगी, जावई, नातू, एक बंधू असा परिवार आहे.

गेल्या महिन्यात निगडी येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. काल रात्री त्यांना पुन्हा त्रास व्हायला लागला. तेव्हा त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

बापूंचे वडील महादेव कुंजीर विहिरीच्या खोदकामाच्या सुरुंगाला बत्ती देण्याचे काम करीत असत. एक दिवस सुरुंगाला बत्ती दिल्यानंतर पाठीमागे वळाल्यानंतर त्यांना अॅटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बापू लहान असताना वडिलांचा अकाली मृत्यूमुळे संसाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर  येऊन पडली आणि संघर्षमय जीवनाची सुरुवात झाली.. मुलांचे वडीलांचे छत्र हरपले, त्यामुळे बाप आणि आई अशा दोन्ही भूमिका या मातेला पार पाडाव्या लागल्या.. मोलमजुरी करून खेड्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे जिकिरीचे झाल्यामुळे दोन लहान मुले आणि आई असे हे कुटुंब पुण्यात आले. 

मुले संघर्ष करण्याच्या वयात येईपर्यंत आईने मिळेल ते काम करून मुलांचे संगोपन सुरू केले. आईच्या मदतीसाठी दोघे भाऊ काबाड कष्ट करू लागले. मोठा मुलगा रामचंद्र मिळेल ते काम करून आईला मदत करू लागला आणि लहान मुलगा शांताराम बापू यांनी आई आणि मोठ्या बंधूंच्या मदतीने वाडिया कॉलेज मधून आपलं शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर पुण्यात सिक्युरिटी गार्ड, पेपर टाकणे, दुधाच्या बाटल्या पोहोचविणे असे मिळेल ते काम करू लागले. शांताराम कुंजीर यांनी वेगवेगळ्या 20 ठिकाणी नोकरी केली.

या काळात मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कामास सुरुवात केली. अखिल भारतीय मराठा महासंघापासून त्यांनी आपल्या कामाची सुरवात केली. पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर मराठा सेवा संघ, बामसेफ अशा संस्थांशी त्यांचा संबंध आला. नंतर संभाजी ब्रिगेडची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरवर दगडफेक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.  मराठा क्रांती मोर्चांच्या संयोजनात ते सक्रिय होते. मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष विजयकुमार ठुबेंच्या माध्यमातून 2005 मध्ये संभाजी ब्रिगेड मध्ये कार्यरत झाले. विविध संघटनांच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, D.Ed. च्या विद्यार्थ्यांचा स्टायपेंडचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, नवोदित लेखकांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी आत्तापर्यंत दहा पुस्तकांचे प्रकाशन, असे सामाजिक काम त्यांनी केले. 

``मराठा क्रांती मोर्चांच्या संयोजनात ते सक्रिय होते. राज्यात झालेल्या शेतकरी संपात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.गेली 26 वर्षे ते सामाजिक कामात सहभागी होते. विचाराला कृतीशील जोड देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. परस्परविरोधी विचारांच्या लोकांशी समन्वय आणि संवादाचा पूल बांधून त्यांनी अनेक उपक्रम तडीस नेले. अनेक अधिवेशन, मेळावे, मोर्चे त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या शिव-शाहू स्वराज्य यात्रेच्या आयोजनात त्यांची प्रमुख भूमिका होती. समाजाच्या हितासाठी दक्ष असणारा कार्यकर्ता म्हणून ते लक्षात राहतील, अशा शब्दांत मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com