Mahayuti's agitation for milk price hike in Pandharpur; Sadabhau Khot criticizes the government | Sarkarnama

बा...विठ्ठला, मुक्‍या, बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला सुबुद्धी दे!

भारत नागणे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार हे मुके, बहिरे आंधळे आहे. अशा सरकारला बा... विठ्ठला सुबुद्धी दे, असे साकडे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) विठ्ठलाला घातले. 

पंढरपूर : राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार हे मुके, बहिरे आंधळे आहे. अशा सरकारला बा... विठ्ठला सुबुद्धी दे, असे साकडे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) विठ्ठलाला घातले. 

गाईच्या दूधाला प्रति लिटर 30 रूपये दर मिळावा, सरकारने प्रतिलिटर दुधाला 10 रूपये अनुदान द्यावे, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी संत नामदेव पायरी जवळ विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. या वेळी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

 

दरम्यान, महायुतीचे नेते आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत यांनी शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) सकाळी पंढरपूर शहरातील सांगोला चौक येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस त्यांच्या जन्मशताब्दी दिनी अभिवादन केले. 

या वेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यातील सुमारे 46 लाख शेतकरी आज राज्य सरकाराच्या विरोधात दूध दरवाढ आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुधाला पाच रूपये अनुदान दिले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने अनुदान बंद केले आहे. शिवाय दूध दरात कपातही केली आहे.

या महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नांशी काही एक देणे घेणे नाही. स्वतःचे खासगी दूध संघ पोसण्याचे काम सध्या या सरकारकडून सुरू आहे, अशी टीका ही सदाभाऊ खोत यांनी केली. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकसंघपणा नाही. एक मुका, दुसरा बहिरा तर तिसरा आंधळा आहे. अशा या सरकारला सर्वसामान्य जनतेचा आक्रोश ऐकायला येत नाही. त्यामुळे अशा निष्क्रीय सरकारच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ही माजी मंत्री खोत यांनी या वेळी दिला आहे. 

या वेळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले, बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळणवर, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, स्वप्नील भोसले, सूरज भोसले आदी उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख