Maharashtra Kesari wrestlers demand to be elected to the Legislative Council | Sarkarnama

महाराष्ट्र केसरी म्हणतात, 'आम्हालाही आमदार करा...' 

संपत मोरे 
सोमवार, 1 जून 2020

"राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची निवड करताना सरकारने एका महाराष्ट्र केसरी मल्लांचा विचार करावा. महाराष्ट्र केसरीला विधान परिषदेचे आमदार करून त्या पदाचा मान राखावा,' अशी मागणी 1978 मधील महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी केली आहे.

पुणे : "राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची निवड करताना सरकारने एका महाराष्ट्र केसरी मल्लांचा विचार करावा. महाराष्ट्र केसरीला विधान परिषदेचे आमदार करून त्या पदाचा मान राखावा,' अशी मागणी 1978 मधील महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी केली आहे. 

"महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आजवर एकदाही पहिलवानांना संधी मिळालेली नाही,' असे कदम म्हणाले. "महाविकास आघाडीतील पक्षांनी महाराष्ट्र केसरीला आमदार करावे,' अशी मागणी अप्पासाहेब कदम यांनी केली आहे. 

जून महिन्यात राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्याची निवड होणार आहे. विधान परिषद सदस्य म्हणून निवड होण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. काहींनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी अर्जही दिले आहेत. सध्या राजकीय वर्तुळात विधान परिषद निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. "महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या वेळी पहिलवानाला संधी द्यावी. मल्लाला जर संधी दिली, तर कुस्तीचा सन्मान होईल,'असे कदम यांनी म्हटले आहे. 

'हिंद केसरी मारुती माने यांना राज्यसभेवर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी त्या संधीचे सोने केले. त्यांच्यानंतर एकही पहिलवानास राज्यसभा किंवा विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळालेली नाही,' असे सांगून कदम म्हणाले,"महाराष्ट्रातील मल्लांनी कुस्तीचा वारसा मोठ्या प्रमाणावर चालवला आहे. अतिशय मेहनत करून कुस्तीगीरांनी देशभर महाराष्ट्राचा दबदबा कायम राखला आहे,' असे कदम यांनी म्हटले आहे

"दरवर्षी महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी शेकडो मल्ल सहभागी होऊन आपले कौशल्य दाखवतात. दिवसेंदिवस ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठित बनली आहे. महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणे, हे आज कुस्तीतल्या तरुणांचे प्रमुख स्वप्न झाले आहे. पहिलवान महाराष्ट्र केसरी व्हायला जीवाचे रान करत आहेत. समाजात महाराष्ट्र केसरी पहिलवानांना मोठी किंमत आहे. महाराष्ट्र केसरी पहिलवानांचा तोच सन्मान राजकीय पक्षांकडून व्हावा. एका महाराष्ट्र केसरीला विधान परिषदेत संधी द्यावी,'अशी मागणी कदम यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख