... I will never forget this excitement: Supriya Sule | Sarkarnama

...ही हुरहुर कधीही विसरणार नाही : सुप्रिया सुळे 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 मे 2020

कुशल सेनानी आणि प्रजेच्या सुखदुःखात सतत त्यांच्या बरोबर असलेल्या आदर्श राजकर्त्या असलेल्या अहिल्याबाई होळकर कायमच आपल्यासाठी वंदनीय आणि प्रेरणास्रोत आहेत

बारामती :  'रयतेसाठी दैवत असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याचे यावर्षी राहून गेले. ही हुरहूर कधीही विसरता येणार नाही,' अशी भावनिक पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. यंदा कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने त्यांना चौंडीला जाणे शक्य झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 

कुशल सेनानी आणि प्रजेच्या सुखदुःखात सतत त्यांच्या बरोबर असलेल्या आदर्श राजकर्त्या असलेल्या अहिल्याबाई होळकर कायमच आपल्यासाठी वंदनीय आणि प्रेरणास्रोत आहेत, असे सांगत, सुळे म्हणतात, 'रयतेसाठी दैवत असलेल्या या मातेला अभिवादन करण्याचे यावर्षी राहून गेले. ही हुरहूर कधीही विसरता येणार नाही. कोरोनासारख्या सांसर्गिक विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आज केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देश संकटात आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. 

कुशल सेनानी आणि न्यायप्रिय दैवत

लॉकडाउनमुळे यंदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी चौंडीला जाता आले नाही, याची मनाला हुरहूर लागल्याची भावना त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी न चुकता खासदार सुप्रिया सुळे चौंडीला जात असतात. यंदा चोंडी येथे जाऊन  अहिल्याबाईंच्या पवित्र स्मृतींसमोर नतमस्तक होता येत नाही. जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यांची तात्काळ तड लावण्याचे अद्भुत कसब अहिल्याबाई यांच्याकडे होते.  केवळ राज्यकर्त्याच नाही तर त्या एक कुशल सेनानी आणि न्यायप्रिय दैवत होत्या. त्यांच्या या असंख्य गुणांची आज आपण आठवण करुयात असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

 

ही बातमी वाचा : पॉझिटिव्ह रूग्णांची 'या' पालकमंत्र्यांनी घेतली भेट...

 

अमरावती : अमरावती जिल्हाच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज थेट जिल्हा कोविड रुग्णालयात एंट्री करीत रुग्णालयातील दाखल असलेल्या रूग्णांशी संवाद साधला. कोरोना रूग्णालयातील सध्याची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेतला. तेथील रुग्णांशी आस्थेने चौकशी केली. आजच्या या त्यांच्या भेटीमुळे कोविड वार्डात काम करणारे डॉक्टर, नर्स सफाई कामगार यांचे मनोबल तर वाढलेच या शिवाय रुग्णांनी पण पालकमंत्र्यांचे आभार मानले गेल्या काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार आज प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख