पुणे जिल्‍ह्यातील  ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व कामकाजाला सुरुवात - GramPanchayat Election Process in Pune Districts Seventy Five Villages Started | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे जिल्‍ह्यातील  ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व कामकाजाला सुरुवात

विनायक चांदगुडे 
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

माहे जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ५८ व नव्याने स्थापन झालेल्या १७ अशा  जिल्ह्यातील एकूण ७५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार येत्या ८ फेब्रुवारी ते १ एप्रिल २१ पर्यंत या ७५ ग्रामपंचायतींचा निवडणूक पूर्व तयारीचा कार्यक्रम  संपन्न होणार आहे. 

शेटफळगढे  : माहे जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ५८ व नव्याने स्थापन झालेल्या १७ अशा  जिल्ह्यातील एकूण ७५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार येत्या ८ फेब्रुवारी ते १ एप्रिल २१ पर्यंत या ७५ ग्रामपंचायतींचा निवडणूक पूर्व तयारीचा कार्यक्रम  संपन्न होणार आहे. 

डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा  प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने २२ जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत मुदत संपत असलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक पूर्व तयारीला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे.
यानुसार तहसीलदार यांच्या वतीने प्रत्येक गावांचे गुगल मॅप नकाशे ८ फेब्रुवारी रोजी अंतिम केले जाणार आहेत.

त्यानंतर ११ फेब्रुवारी पर्यंत संबंधित तलाठी व ग्रामसेवक  स्थळ पाहणी करून प्रभाग पाडून त्याच्या सीमा निश्चिती करून अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे . त्यानंतर या प्रारूप प्रभाग रचनेस १६  फेब्रुवारीला तहसीलदार यांच्या वतीने मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर गरज असल्यास २२ फेब्रुवारी २१ पर्यंत यात आवश्यकता असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुरुस्त्या केल्या जाणार आहेत.

त्या दुरुस्त्याना पुन्हा २५ फेब्रुवारी पर्यंत तहसीलदार यांच्या वतीने मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी प्रभाग निहाय आरक्षण  काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना  काढली जाणार आहे. तर ४ मार्च रोजी  होणाऱ्या विशेष ग्रामसभेत प्रभाग निहाय  प्रत्यक्षात आरक्षणे काढली जाणार आहेत. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचने वर नागरिकांना हरकती दाखल करता याव्यात यासाठी येत्या ५ मार्च २१ रोजी तहसीलदार यांच्या वतीने प्रसिद्धी दिली जाणार आहे. तर येत्या १२ मार्च २१ पर्यंत या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहेत.

प्राप्त झालेल्या हरकतीं १५ मार्च २१ पर्यंत तहसीलदार यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केल्या जाणार आहेत. या सर्व हरकतींवर २२ मार्च २१ पर्यंत उपविभागीय अधिकारी अधिकार्‍यांच्या वतीने सुनावणी घेतली जाणार आहे.  या सुनावणीनंतर अभिप्राय सह या हरकतींवर अंतिम निर्णयासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे .२५ मार्चपर्यंत पाठवला जाणार आहे.

त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी  पाठविलेल्या  प्रस्तावांची तपासणी करून येत्या ३०  मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्या  वतीने  या प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यानंतर येत्या  १ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या या प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिली जाणार आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे -खेड ४ , मावळ १, बारामती २, इंदापूर २ , मुळशी १, आंबेगाव १५ जुन्नर ३२, हवेली १ 

नव्याने स्थापित झालेल्या  १७ ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे- इंदापूर २, आंबेगाव २, जुन्नर ४, हवेली २, शिरूर ५, भोर २

सरपंच उपसरपंच निवडी ९ व १०  फेब्रुवारीला

१५ जानेवारी रोजी मतदान संपन्न झालेल्या जिल्ह्यातील ७४२  ग्रामपंचायतींचा सरपंच व उपसरपंच निवडी  येत्या ९ व १० फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहेत.  या निवडीसाठी तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी  जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना १ फेब्रुवारीच्या  आदेशाच्या आधारे दिले आहेत

सरपंच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे खऱ्या अर्थाने गावगाड्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे.  तसेच  गेल्या  दहा महिन्यापासून कोरोना मुळे व   ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्यामुळे ठप्प झालेल्या विकास कामांना गती मिळण्यास ९ व १०   फेब्रुवारी च्या सरपंच निवडी संपन्न झाल्यानंतर तेथून पुढील काळात खऱ्या अर्थाने गती येणार आहे  त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख