Farmer give the six row-houses for quarantine! | Sarkarnama

पहा शेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती...क्वॉरंटाइनसाठी दिले नवे करकरीत सहा रो-हाऊस! 

चंद्रकांत घोडेकर 
शुक्रवार, 22 मे 2020

गिरवली (ता. आंबेगाव) येथील शेतकरी मधुकर गणपत हगवणे यांनी स्वतःचे सर्व सोयी-सुविधांनी युक्त नव्यानेच बांधलेले सहा रो-हाऊस बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना क्वॉरंटाइन ठेवण्यासाठी दिले आहेत.

घोडेगाव ः गिरवली (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथील शेतकरी मधुकर गणपत हगवणे यांनी आपले स्वतःचे सर्व सोयी-सुविधांनी युक्त नव्यानेच बांधलेले सहा रो-हाऊस बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना क्वॉरंटाइन ठेवण्यासाठी दिले आहेत. या रो-हाऊसची अजून वास्तूशांतीही झालेली नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हगवणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 

आंबेगाव तालुक्‍यातील इतर गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण मिळू नये, या साठी उपजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. 

याच अनुषंगाने गिरवली ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथील मधुकर हगवणे यांनी समाजाप्रति आपली सामाजिक बांधीलकी जपत स्वतःचे सर्व सुविधांनी युक्त असे नव्याने बांधकाम केलेले ज्याची अजून वास्तुशांतीदेखील झाली नाही, असे सहा रो-हाऊस पुणे, मुंबई आदी विविध ठिकाणांहून आलेल्या आपल्या गावांतील नागरिकांसाठी 14 दिवस कोरोना विषाणुच्या अनुषंगाने क्वारंटरइन राहण्यासाठी दिले आहेत. 

या वेळी मधुकर हगवणे, गिरवलीचे सरपंच संतोष सैद, तलाठी दीपक करडुले, ग्रामसेवक जयवंत मेंगडे, पोलिस पाटील रेणुका सैद आदी उपस्थित होते. 

गिरवलीचे सरपंच संतोष सैद यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गिरवली गाव व लगतच्या वाडयावस्त्यांवर होऊ नये, यासाठी निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये 2 हजार 809 लोकसंख्या असलेल्या 542 कुटुंबाला साबण, सॅनिटायझर आदींचे वाटप करण्यात आले आहे.

बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, रो-हाऊस आदी ठिकाणी क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. या कामासाठी गावातील उपसरपंच नीलम सैद, देवराशेठ सैद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक यांनी सहकार्य केले, असे सरपंच संतोष सैद यांनी सांगितले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख