....या साठी विजय शिवतारे भेटले अजित पवारांना! - Ex Minister Vijay Shivtare Met Deputy Chief Minister Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

....या साठी विजय शिवतारे भेटले अजित पवारांना!

श्रीकृष्ण नेवसे 
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कोरोनाने तालुक्यात झालेल्या भीषण परिस्थितीची माहिती आपण अजित पवार यांना दिल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले. पुरंदरला विविध उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने लक्ष घालण्याची विनंती पवार यांना केल्याचेही श्री. शिवतारे यांनी सांगितले. 

सासवड  : पुरंदर तालुक्यात कोरोनाने मोठी उसळी घेतली आहे. या संसर्गामुळे बेजार झालेल्या तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी माजी राज्यमंत्री व शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. 

कोरोनाने तालुक्यात झालेल्या भीषण परिस्थितीची माहिती आपण अजित पवार यांना दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले. पुरंदरला विविध उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने लक्ष घालण्याची विनंती पवार यांना केल्याचेही श्री. शिवतारे यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, "काल सोमवारी (ता. २१)  जवळपास ५ तास डायलिसीस करून सायंकाळी ४ वाजता मी श्री. पवार यांच्या भेटीला गेलो.  माझी किडनी निकामी असल्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मला सार्वजनिक जीवनात जाण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. माझी मला चिंता आहे; पण दुसरीकडे तालुक्यातील कोरोना संसर्ग, वाढती कोरोनाबाधीत संख्या, कोविड केअर सेंटरमधील अपेक्षित सुविधांची कमतरता, अपुरे बेड, हाॅस्पीटल धर्तीवर बेडची कमीच उपलब्धता, रुग्ण दगाविण्याचे इतरत्रच्या तुलनेत वाढते प्रमाण, आदी प्रकाराने परिस्थिती गंभीर बनली आहे,"

"तालुक्यातील कोरोना विरुद्धच्या लढाईचा आढावा घेत पालकमंत्री पवार यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आहे. शिवाय योग्य त्या अनेक उपाययोजना सांगितल्या आहेत. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन पुढे लवकरात लवकर हालचाली करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे,'' असेही शिवतारे म्हणाले. 

मुख्यमंत्री व शरद पवार यांनाही भेटणार
दरम्यान लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही भेटणार असल्याचे शिवतारेंनी सांगितले. कोविड आटोक्यात आणण्यासाठी आपण सर्व बाजूंनी प्रयत्न करणार असल्याचे शिवतारे म्हणाले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख