Discharge of 1822 patients recovered from Corona in Pune | Sarkarnama

पुण्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या 1822 रुग्णांना डिस्चार्ज 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. सोमवारीही (ता. 3 ऑगस्ट) दिवसभरात 1822 कोरोना रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आजपर्यंत एकूण 39 हजार 939 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे

पुणे : कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. सोमवारीही (ता. 3 ऑगस्ट) दिवसभरात 1822 कोरोना रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आजपर्यंत एकूण 39 हजार 939 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात येत असल्याने संपूर्ण आरोग्य विभागाचे लक्ष पुण्याकडे लागले आहे. मुख्यमंत्र्यांनीही पुण्यात बैठक घेत तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीत प्रशासनाचे कान टोचले होते. त्यानंतर प्रशासन वेगाने कामाला लागले आहे. 

दरम्यान, सोमवारी दिवसभरात एकूण 4 हजार 604 जणांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले. आज एकूण 781 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्या तुलनेत रुग्ण बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनातून बरे झालेल्या 1822 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्यांची संख्या वाढती आहे. पुणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 39 हजार 939 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. 

पुण्यात आज 23 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील पाच रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. क्रिटिकल रुग्णांची संख्या 633 असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील 389 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. 

पुण्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 58 हजार 304 वर पोचली आहे. त्यात ऍक्‍टिव्ह रुग्ण 16 हजार 981 एवढे आहेत 
कोरोनाचा संसर्ग होऊन आजपर्यंत पुण्यात एकूण 1384 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींना इतरही आजार होते. 

राज्यातील रुग्णसंख्या साडेचार लाखावर 

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढते प्रमाण कायम असून सोमवारी (ता. 3) दिवसभरात 8,968 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 4,50,196 झाली आहे.

दरम्यान, आज राज्यात 266 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 15,842 वर पोहोचला आहे. राज्यात सध्या 1,47,018 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

सोमवारी राज्यातील 10,221 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 2,87,030 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.76 टक्के झाले आहे. आज झालेल्या 266 मृत्यूंपैकी ठाणे परिमंडळ 83, पुणे मंडळ 66, नाशिक 19, औरंगाबाद मंडळ 4, कोल्हापूर 20, लातूर मंडळ 14, अकोला मंडळ 7, नागपूर 50 व बाहेरील राज्यातील 3 मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 3.52 टक्के इतका आहे. 

साडेनऊ लाख लोक होम क्वारंटाइन 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 22,98,723 नमुन्यांपैकी 4,50,196 ( 19.58 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,40,486 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 37,009 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
 

Edited By Vijay Dudhale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख