पुणे : दुसऱ्या पत्नीच्या बहिणीने बलात्काराचा आरोप केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. या महिलेच्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संबंधित महिलेनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून, आता या प्रकरणावरून भाजप आक्रमक झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राच्या माध्यमातून केली .
पत्रात म्हटले आहे की, आपल्या आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात महिलेने बलात्काराचा आरोप करत मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा खापरे यांनी दिला आहे.
सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.
वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असे पत्र उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे. हे सर्व आरोप खोटे असून, बदनामी आणि ब्लॅकमेल करणारे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तक्रारदार तरुणीच्या बहिणीशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असेही मुंडेंनी स्पष्ट केले आहे.
मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. तिने तिच्या जिवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत हा प्रकार मांडला आहे.
या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला आहे.

