आप्पा... सकाळी लवकर उठून कामं केली असती तर आमदार असता! - Deputy CM Ajit Pawar reminded Ramesh Thorat of his election defeat | Politics Marathi News - Sarkarnama

आप्पा... सकाळी लवकर उठून कामं केली असती तर आमदार असता!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या पहाटे उठून विकासकामांचा आढावा, पाहणी दौरे, बैठका सुरू करतात. रविवारीही सकाळी साडे सात वाजताच त्यांनी जिल्हा बँकेच्या जळोची शाखेचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांची फिरकी घेतली.

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या पहाटे उठून विकासकामांचा आढावा, पाहणी दौरे, बैठका सुरू करतात. रविवारीही सकाळी साडे सात वाजताच त्यांनी जिल्हा बँकेच्या जळोची शाखेचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांची फिरकी घेतली. ''आप्पा.. तुम्हीही सकाळी उठून लोकांची कामे केली असती तर आज दौंडचे आमदार झाला असता'', असे म्हणत त्यांनी थोरातांना निवडणुकीतील पराभवाची आठवण करून दिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी रविवारी बारामती नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. सकाळी साडे सात वाजल्यापासूनच त्यांच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली. सकाळी लवकर उठून कामांना सुरूवात करणे, ही अजित पवारांची खासियत आहे. कोणत्याही कार्यक्रमाला वेळेत हजर राहणे, याबाबतही ते दक्ष असतात. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पध्दत माहिती आहे.

सकाळी साडे सात वाजता पवार यांच्या हस्ते जिल्हा बॅंकेच्या जळोची शाखेचे उदघाटन झाले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात हेही उपस्थित होते. अजितदादांनी यावेळी बोलताना रमेश थोरात यांची फिरकी घेतली. ते म्हणाले,  ''रमेशआप्पांना वाटलं इतक्या सकाळी कोण येतंय. कार्यक्रमाला लोकांची गर्दी पाहिल्यावर त्यांना कळलं असेल की बारामतीकर विरोधकांचं डिपॉझीट कसं जप्त करतात. त्यासाठी सकाळी लवकर उठून कामं करावी लागतात. तुम्हीही सकाळी लवकर उठून कामं केली असती तर आता दौंडचे आमदार झाला असता.''

दौंडचे विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात यांचा अवघ्या 673 मतांनी राहूल कुल यांनी पराभव केला आहे. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत निसटता पराभव झाल्याने जिव्हारी लागला. अजित पवार यांच्याकडून या पराभवाची सल सातत्याने बोलून दाखविली जाते. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने संपुर्ण ताकद पणाला लावली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनही येथे सभा घेतली होती. पण अजित पवार यांची सभा झाली नव्हती. याचीही आठवणही अजितदादांकडून सातत्याने करून दिली जाते. माझी सभा झाली असती तर किमान एवढी मतं तरी वाढली असती, असे त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखविले होते. बारामतीत झालेल्या कार्यक्रमात पुन्हा या पराभवाची आठवण करून देत त्यांनी थोरात यांना सल्ला दिला.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख