श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन 8 जूनपासून शक्य; पण...

केंद्र सरकारने लॉकडाउनचा पाचवा टप्पा जाहीर केला असून, यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर सर्वच क्षेत्रातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात धार्मिक स्थळे सुरू करण्यास 8 जूनपासून परवानगी देण्यात आली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन 8 जूनपासून शक्य; पण...
dagdusheth ganpati temple in pune may be open from 8 june

पुणे : केंद्र सरकारने लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात धार्मिक स्थळे पुन्हा 8 जूनपासून खुली  करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना आता लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन 8 जूनपासून घेणे शक्य होणार आहे. परंतु, त्यासाठी राज्य सरकारच्या सुधारित आदेशाची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारचा सुधारित आदेश आल्यानंतर भाविकांना पुन्हा एकदा बाप्पाचे मनोभावे दर्शन घेता येईल. 

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा देशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत भाविकांची गर्दी असते. केंद् सरकारने  मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने 8 जूनपासून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन भाविकांना घेणे शक्य होईल, असा अंदाज आहे.  

मंदिर कंटेन्मेंट झोनबाहेर : रासने 

या विषयी बोलताना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले की, केंद्र सरकारने 8 जूनपासून मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. राज्य सरकारने याबाबत सुधारित आदेश काढल्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. आम्ही राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहोत. पुण्याच्या पूर्वभागात काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत, मात्र दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे मंदिर त्याबाहेर आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनचे नियम या मंदिराला लागू होणार नाहीत.

केंद्र सरकारने लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात मंदिरे, मॉल आणि हॉटेल 8 जूनपासून खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर  देशांतर्गत आणि जिल्हांतर्गत वाहतूकही खुली करण्याचा निर्णयही घेतला आहे. शाळा, महाविद्यालये 30 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच थिएटर, बार, जिम, मेट्रो आदींवरीलही निर्बंध कायम राहणार आहेत. याबाबत परिस्थिती पाहून आणि राज्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. 

केंद्र सरकारने आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे प्रवासासाठी आता कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. मात्र, सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन  राज्य सरकार ही वाहतूक नियंत्रित करण्याचा निर्णय घेऊ शकते. विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक या पूर्वीच्या निर्णयानुसार सुरू राहणार आहे. मालवाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतील, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांतूनही भाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येऊ शकतील.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in