पुण्यात टास्क फोर्स किंवा सचिव समिती पाठविण्याची बापट यांची केन्द्राकडे मागणी - BJP MP Girish Bapat Demands Task Force for Pune | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात टास्क फोर्स किंवा सचिव समिती पाठविण्याची बापट यांची केन्द्राकडे मागणी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

खासदार गिरीष बापट यांनी हर्षवर्धन यांना पुण्यातील वस्तुस्थिती सादर केली. पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने केंद्रीय पथक पाठवावे. परिस्थितीची पाहणी करावी. मृत्युदर कमी करून रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी तातडीने हालचाल करावी. अशी मागणी श्री. बापट यांनी केली. आज दुपारी नवी दिल्लीतील पत्रकारांना बापट यांनी ही माहिती दिली 

नवी दिल्ली  : कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी विशेष कृती पथक तातडीने नियुक्त करावे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. श्री बापट यांनी संसद अधिवेशनात आज शून्य प्रहरात पुणे जिल्ह्यातील कोरोनाची गंभीर स्थिती या विषयावर चर्चा घडवून आणली. तसेच या विषयाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी  हर्षवर्धन यांची समक्ष भेटही घेतली.  

बापट यांनी हर्षवर्धन यांना पुण्यातील वस्तुस्थिती सादर केली. पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने केंद्रीय पथक पाठवावे. परिस्थितीची पाहणी करावी. मृत्युदर कमी करून रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी तातडीने हालचाल करावी. अशी मागणी श्री. बापट यांनी केली. आज दुपारी नवी दिल्लीतील पत्रकारांना बापट यांनी ही माहिती दिली 

ते म्हणाले, "पुणे जिल्ह्यासाठी तातडीने व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, डॉक्टर आणि वैद्यकीय सेवक पुरविण्याची गरज आहे. पुणे महानगरपालिका व जिल्हा परिषद याबाबत प्रयत्न करीत असले तरी साधनसामुग्री अभावी ते प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. दिनांक ६ सप्टेंबर रोजी पुण्यामध्ये ३८८९ कोरोना बाधित रुग्ण आढळले, याच दिवशी ३३३४ रुग्ण बरे झाले. परंतु त्याच दिवशी ७० रुग्णांचा मृत्यू झाला. आज पर्यंत पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या २३११९६ पर्यंत गेली असून त्यापैकी सक्रिय रुग्णांची संख्या ४१३६६ एवढी आहे. ही परिस्थिती संपूर्ण देशाचा विचार करता अतिशय गंभीर अशी  आहे. याकडे मी आज लोकसभा सदस्यांचे लक्ष वेधले,"

''पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद व राज्य शासन यांनी केंद्राच्या मार्गदर्शनानुसार पावले उचललेली आहेत. सुमारे २० आयएएस अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तथापि समन्वयाअभावी कोरोना नियंत्रणात येत नाही. तज्ञ डॉक्टरांचा तुटवडा आणि वैद्यकीय सेवा करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. असे मी केंद्राच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे  उपस्थित होते. माझ्या मागणीला पाठिंबा देऊन त्यांनी आज स्वतंत्रपणे आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले,'' असेही बापट यांनी सांगितले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख