विरोधकांचा उमेदवार कुणीही असला तरी जिंकणार आम्हीच : संग्राम देशमुख - BJP Candidate Sangram Deshmukh Confident about winning from Pune Consituency | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधकांचा उमेदवार कुणीही असला तरी जिंकणार आम्हीच : संग्राम देशमुख

उमेश घोंगडे
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

संग्राम देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांचे बंधू पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्रात काम असल्याने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा संपर्क चांगला आहे. देशमुख यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यातून अरूण लाड हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदारसंघ आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन वेळा तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. पक्षाचा विचार आमच्यासाठी महत्वाचा असून विरोधात कोणताही उमेदवार आला तरी आम्हीच जिंकून येणार आहोत, असा विश्‍वास भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी आज व्यक्त केला.

देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर 'सरकारनामा'शी बोलताना त्यांनी विजयाचा आत्मविश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले, "या मतदारसंघात प्रकाश जावडेकर तसेच चंद्रकांत पाटील यांच्या काळात चांगले काम झाले आहे. पक्ष म्हणून आम्ही सातत्याने काम करीत आहोत. पदवीधर मतदारांची नोंदणीदेखील मोठ्या संख्येने केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत निश्‍चितपणे निवडून येणार आहे. विरोधकांकडून अद्याप उमेदवारी निश्‍चित झालेला नाही. मात्र, कोणताही उमेदवार असली तरी फारसा फरक पडणार नाही.''

देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांचे बंधू पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्रात काम असल्याने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा संपर्क चांगला आहे. देशमुख यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यातून अरूण लाड हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. लाड यांच्यासोबत उमेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. या दोघांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज होण्याची शक्‍यता आहे. जो उमेदवार जाहीर होईल त्याचा अर्ज उद्या (ता.१२) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भरण्यात येणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख