bhama askhed protesters give warning to state government | Sarkarnama

...तर मावळची पुनरावृत्ती करू; भामा आसखेड आंदोलकांचा इशारा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम आज भामा आसखेड आंदोलकांनी बंद पाडले. सरकारने मागण्यांवर वेळीच निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

आंबेठाण : मागण्या प्रलंबित असताना आणि ठरल्याप्रमाणे एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बाकी ठेवायचे असतानाही पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम आज सुरू करण्यात आल्याने आक्रमक झालेल्या भामा आसखेड आंदोलकांनी हे काम बंद पाडले. यामुळे चाकण पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून काम सुरू ठेवण्याबाबत सूचना केल्या परंतु, काम बंद ठेवण्यावर शेतकरी ठाम राहिले.

आसखेड खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत सुरू करण्यात आलेले काम शेतकऱ्यांनी आज बंद पाडले. शेतकऱ्यांना विचारात घेऊन पुढील कार्यवाही व्हावी अन्यथा शेतकरी आंदोलनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त भावना या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यात ठरल्याप्रमाणे सरकार वागत नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. याप्रसंगी सत्यवान नवले, शांताराम शिवेकर, नथु धंद्रे, विलास नवले, अजय नवले आदी उपस्थित होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांना जमीन वाटप करावे, अपात्र शेतकऱ्यांना योग्य पॅकेज द्यावे तसेच, तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा या प्रमुख मागण्यांसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात, न्यायालयाच्या आदेशानुसार वाटप करण्यात आलेल्या जमिनीचा ताबा मिळावा, वाढीव मोबदला मिळावा आणि बाधित गावांना नागरी सुविधा मिळाव्यात अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी याआधी अनेक वेळा आंदोलन करून काम बंद पाडले होते. यामुळे तत्कालीन पालकमंत्री, प्रशासन आणि शेतकरी यांच्यात चर्चा होऊन तोडगा निघाला होता.त्यानुसार एक किलोमीटर जलवाहिनीचे काम थांबवून अन्य काम सुरु करण्याचे ठरले होते आणि त्याप्रमाणे कार्यवाही झाली होती. 

आज अचानक जलवाहिनाचे कामही सुरू केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी ते बंद पाडले. त्यानंतर शेतकऱ्यांना चाकण पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. सत्यवान नवले, देविदास बांदल यांनी पोलिस प्रशासनाशी चर्चा केली. या वेळी गजानन कुडेकर, गणेश जाधव,तुकाराम नवले, देविदास जाधव हे शेतकरी उपस्थित होते तर प्रशासनच्या वतीने प्रांताधिकारी संजय तेली, सहायक पोलिस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव, पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के उपस्थित होते.

उद्यापासून काम सुरू करणार असून, १०० मीटरचे काम बाकी ठेऊ आणि लवकरात लवकर पुढील बैठकीचे आयोजन करू. 
-  संजय तेली, प्रांताधिकारी
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख