बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व - Baramati NCP Workers Celebrating Win in Grampanchayat Elections | Politics Marathi News - Sarkarnama

बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

मिलिंद संगई
सोमवार, 18 जानेवारी 2021

तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. पहिल्या तीन टप्प्यात प्रत्येकी पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली असल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व यंदाही कायम दिसले. 

बारामती :  तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. पहिल्या तीन टप्प्यात प्रत्येकी पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली असल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व यंदाही कायम दिसले. 

सकाळपासून एमआयडीसीतील रिक्रीएशन हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. एकेक निकाल हाती यायला लागल्यानंतर उमेदवारांच्या चेह-यावर हास्य व दुःख अशा प्रतिक्रीया स्पष्टपणे पाहायला मिळाल्या. यंदा जिल्हाधिका-यांनी गुलाल उधळण्यासह फटाक्यांची आतषबाजी करण्यास मनाई केल्याचा चांगला परिणाम जाणवला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत विजयी उमेदवारांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढली. सर्वच विजयी उमेदवारांनी आपापल्या गावाकडे प्रयाण केल्यामुळे हळुहळू गर्दीही ओसरली. 

तहसिलदार विजय पाटील यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे वेगाने निकाल हाती आले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, राहुल आवारे यांच्यासह पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे व सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सांगवीमध्ये चंद्रराव तावरे यांनी ताकद लावली होती मात्र तेथेही राष्ट्रवादीच्या दहा उमेदवारांचा तर तावरे यांच्या पाच उमेदवारांचा विजय झाला, माळेगाव कारखान्यापाठोपाठ सांगवी गावातही चंद्रराव तावरे यांना पराभव स्विकारावा लागला. 

अनिल तावरे, प्रकाश तावरे, महेश तावरे, किरण तावरे यांनी संयुक्त प्रयत्न करीत सांगवी येथे राष्ट्रवादीकडे सत्ता खेचून आणली. ही निवडणूक तालुक्यात प्रतिष्ठेची होती.  कांबळेश्वर मध्ये माजी सभापती करण खलाटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या विरोधातील सुरेश खलाटे व गणपत खलाटे यांच्या पॅनेलला आठ जागा तर करण खलाटे यांच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. 

को-हाळे बुद्रुकमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या पॅनेलने एकहाती विजय मिळविला. खोमणे यांच्या पॅनेलला आठ जागा मिळाल्या.  सुनील भगत यांच्या पॅनेलला चार, लालासाहेब माळशिकारे यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या. वडगाव निंबाळकर मध्ये सुनील ढोले, धैर्यशिल राजेनिंबाळकर व अनिलकुमार शहा यांच्या पॅनेलला अकरा जागा मिळाल्या. संग्रामसिंह राजेनिंबाळकर यांच्या पॅनेलला पाच जागा मिळाल्या. 

होळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या पॅनेलला अकरापैकी दहा जागा मिळाल्या. त्यांनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. सोमेश्वरचे संचालक सिध्दार्थ गीते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला पराभव पत्करावा लागला. 

निंबूत ग्रामपंचायतीत नऊ जागा प्रमोद काकडे व सतीश काकडे यांच्या पॅनेलला तर सहा जागा गौतम काकडे व महेश काकडे यांच्या पॅनेलला मिळाल्या. सतीश व प्रमोद काकडे यांनी सत्ता राखली असली तरी प्रथमच त्यांच्या विरोधात सहा जागा निवडून आल्या. झारगडवाडीमध्ये छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर व बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर यांच्या पॅनेलचा विजय झाला. १५ पैकी ११ जागांवर त्यांनी विजय मिळविला. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख