Along with the Chief Minister, this Warkari will perform Maha Puja of Vitthal on Ashadi | Sarkarnama

आषाढीला हा वारकरी करणार मुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची महापूजा 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 29 जून 2020

आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांबरोबर दरवर्षी वारकऱ्याला मिळत असतो. यंदा कोरोनाच्या लॉकडाउनमुळे वारकऱ्यांसाठी मंदिर बंद असणार आहे.

आळंदी (पुणे)  : आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांबरोबर दरवर्षी वारकऱ्याला मिळत असतो. यंदा कोरोनाच्या लॉकडाउनमुळे वारकऱ्यांसाठी मंदिर बंद असणार आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे यांना मिळणार आहे. मंदिरातील सहा विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठीद्वारे निवड करून मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. 

पालखीचा पायी वारी सोहळा यंदाच्या वर्षी कोरोनामुळे राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे या वर्षी लाखोंची गर्दीही नाही आणि दर्शनासाठीची भली मोठी रांगही नसणार आहे. यंदाच्या वर्षी वारकऱ्यांना तासन्‌तास रांगेत ताटळकत थांबवे लागणार नाही. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात परंपरेने होणारी आषाढी एकादशीची (ता. 1 जुलै) पहाटे सव्वा दोनची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांसमेवत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी दरवर्षी दर्शनाच्या रांगेतील वारकरी निवडला जातो. मात्र, या वर्षी वारीच रद्द करण्यात आल्याने मानाचा वारकरी कोण याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले होते. त्यातच श्री पांडुरंगाचे मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरात चोविस तास पहारा देणाऱ्या सहा विणेकऱ्यांची नावे लिहून चिठ्ठ्या टाकण्याचा निर्णय झाला. त्यानुसार चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्या चिठ्ठ्यांमध्ये विणेकरी विठ्ठल बढे यांना शासकीय महापुजेसाठी मानाचा वारकरी म्हणून मंदिर समितीने घेतलेल्या बैठकीत संधी देण्याचे ठरविण्यात आले. 

या बैठकीस मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर जळगावकर महाराज, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. 

दरम्यान, विठ्ठल बढे मंदिरात विणेची सेवा करतात. नगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ येथील ते रहिवासी असून ते चौऱ्याऐंशी वर्षांचे आहे. घरात वारीची परंपरा असून सर्वच सदस्य माळकरी आहेत. गेली पाच ते सहा वर्षे बढे श्री विठ्ठल मंदिरात पहारा देण्याचे काम करत आहेत. लॉकडाउन काळात तर मंदिराबाहेर न जाता त्यांनी पूर्ण वेळ पहारा दिला आहे. एकंदर पूर्ण वेळ पहारा दिल्यानेच त्यांना विठ्ठलाची कृपाप्रसाद मिळाला आहे. 

दरम्यान, निवड झालेल्या विठ्ठल बढे यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटीव्ह आली आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या सदस्य ऍड माधवी निगडे यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख