बारामतीतील ती रिक्षा वापरून अजितदादांनी टायमिंग साधले 

‘आपले सरकार हे तीनचाकी रिक्षा असली तरी तिचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे,’ असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २७ जुलै) ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलेला फोटो पाहून त्यांनी न बोलताही त्या दाव्याला प्रतित्त्युर दिल्याचे मानले जात आहे.
Ajit Pawar used that rickshaw in Baramati to achieve the exact timing
Ajit Pawar used that rickshaw in Baramati to achieve the exact timing

पुणे : ‘आपले सरकार हे तीनचाकी रिक्षा असली तरी तिचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे,’ असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २७ जुलै) ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलेला फोटो पाहून त्यांनी न बोलताही त्या दाव्याला प्रतित्त्युर दिल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारच्या (ता. २६ जुलै) मुलाखतीत केलेल्या दाव्यावर अचूक टायमिंग साधत अजितदादांनी सरकारचे स्टिअरिंग कुणाच्या हाती आहे, हे दाखवून दिले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलली मुलाखत गेली दोन दिवस प्रसिद्ध झाली आहे. त्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन चाकी रिक्षा आहे. ही रिक्षा गरिबांची आहे. मात्र, या रिक्षाचे स्टिअरिंग माझ्या हातात असून पाठीमागे दोघे जण (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस) बसले आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोमवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अजित पवार यांनी ठाकरे यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यासाठी बारामती येथे गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनातील फोटो वापरण्यात आला आहे. 

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा तो पहिलाचा जाहीर कार्यक्रम होता. कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनासाठी आलेल्या ठाकरे यांना शारदानगरच्या कृषी विज्ञान केंद्राचा परिसर दाखविण्यात येणार होता. त्या इलेक्ट्रीक रिक्षाचे सारथ्य करून अजित पवारांनी तो सर्व परिसर मुख्यमंत्र्यांना दाखविला होता. त्या वेळीही महाविकास आघाडी सरकारचे स्टिअरिंग अजितदादांच्या हाती अशी चर्चा माध्यमात झाली होती. आज तोच फोटो वापरून अजित पवाार यांनी पुन्हा एकदा राजकीय गंमत केली आहे. 

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीतील त्याच कार्यक्रमाचा फोटो वापरून अजितदादांनी न बोलताही अचूक टायमिंग साधत मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे. 

खरं तर अजित पवार हे फटकळ स्वभावाचे आणि सडेतोड बोलणारे म्हणून सर्व राज्याला परिचित आहेत. अशाच फटकळ आणि सडेतोड बोलण्यामुळे अनेकदा ते अडचणीतही आले आहेत. मात्र अजित पवारांनी प्रथमच न बोलताही राज्याच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेकदा अजित पवारांनी पुढाकार घेऊन निर्णय घेतल्याचे दिसत आहे. त्यात नुकतेच घडलेल्या सारथी संस्थेसंदर्भातील बैठकीचे उदाहरण देता येईल. त्यात त्यांनी एकाच दिवसात सारथीचा निधीसंदर्भातील प्रश्न सोडवला होता. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळातही इतर मंत्री आपापल्या जिल्ह्यात असताना पवार मात्र मंत्रालयात येऊन राज्याचा कोसळलेला आर्थिक गाडा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com