Shivshrishti to be created in Baramati by Ajit Pawar
Shivshrishti to be created in Baramati by Ajit Pawar

अजित पवार बारामतीत साकारणार शिवसृष्टीचा भव्य प्रकल्प.....

बारामतीनजिक कण्हेरी गावालगत असलेल्या १०३ हेक्टरवर वनउद्यान साकारणार असून त्याला लागूनच नियोजित संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत ७०० मीटरवर शिवसृष्टीचा प्रकल्प साकारणार आहे. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व सुधीर पानसरे यांनी या बाबत माहिती दिली.

बारामती : आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा असावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, तसेच बारामतीला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि बारामतीच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी या उद्देशाने बारामतीत २५ एकर जागेवर शिवसृष्टीचा भव्य प्रकल्प साकारला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिवसृष्टी हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून वनउद्यान व शिवसृष्टी बारामतीत येणा-या प्रत्येकाच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

बारामतीनजिक कण्हेरी गावालगत असलेल्या १०३ हेक्टरवर वनउद्यान साकारणार असून त्याला लागूनच नियोजित संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत ७०० मीटरवर शिवसृष्टीचा प्रकल्प साकारणार आहे. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व सुधीर पानसरे यांनी या बाबत माहिती दिली.

कण्हेरी गावाच्या शिवेवरुन शिवसृष्टीकडे जाताना इतिहासाची आठवण जागृत व्हावी या साठी दगडी पाय-या तयार केल्या जाणार आहेत. पार्किंग व महाप्रवेशद्वाराच्या मध्ये नीरा डावा कालव्यावर एक पूल असून प्रवेशद्वारानजिक एक झाडाचा पार तयार होणार आहे. या शिवसृष्टीची माहिती देणारा गाईड हा शिवरायांच्या मावळ्याच्या वेशात असेल व तोच आतील सर्व माहिती येणा-या पर्यटकांना सविस्तरपणे सांगेल.
 
थ्रीडी इफेक्टमध्ये पावनखिंडीची लढाई...
शिवसृष्टीत प्रवेश केल्यानंतर सुरवातीलाच बारा बलुतेदारांची वस्ती तयार केली जाणार आहे. शिवरायांनी बारा बलुतेदारांना आपल्या स्वराज्यात सन्मानाचे स्थान दिले होते, त्याची आठवण या निमित्ताने जागी होईल. त्या नंतर शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती तयार होईल, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचे दाखविले जाईल. त्या नंतर ज्या तोरणा किल्ल्यावर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या किल्ल्याची व त्या नंतर अफझलखानाचा वध केला त्या प्रतापगडाची प्रतिकृती तयार होणार आहे. त्या नंतर थ्रीडी इफेक्टमध्ये पावनखिंडीमध्ये झालेली ऐतिहासिक लढाई पाहायला मिळेल. त्या नंतर लाल महालाची प्रतिकृती असेल. त्या पाठोपाठ पुरंदर किल्ला प्रतिकृतीच्या स्वरुपात अवतरेल. या सर्वांच्या मधोमध रायगडाची प्रतिकृती असेल.
 
शिवसृष्टीत साकारणार राजसदर....
या शिवसृष्टीचे वैशिष्टय म्हणजे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची जशी राजसदर आहे, हुबेहूब तशीच राजसदर या शिवसृष्टीत तयार होणार आहे. शिवाजी महाराजांचा मेघडंबरीत सिंहासनाधिष्ठीत भव्य पूर्णाकृती पुतळा येथे उभारला जाणार असून तो अत्यंत सुंदर असेल. याच ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाचा लेझर शो आठवड्यातून पाच दिवस संध्याकाळी  दाखविला जाणार आहे. हा लेझर शो या शिवसृष्टीचे सर्वात मोठे आकर्षण असेल. सर्वात शेवटी शिवाजी महाराजांची समाधी असून त्याचे दर्शन घेऊन लोक बाहेर पडतील. याच ठिकाणी रायगडावर बाजारपेठ भरायची, तिच हुबेहूब साकारली जाईल. या शिवाय मुघल दरबार असून आग्र्याहून महाराजांच्या सुटकेचा प्रसंग येथे साकारला जाईल.

सिंधुदुर्ग किल्ला आकर्षणाचा केंद्रबिंदू...
सिंधुदुर्ग किल्ला ज्या पध्दतीने पाण्यात आहे, त्याच धर्तीवर चारही बाजूला पाणी करुन त्यात किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाणार असून ती पाहायला जाताना बोटीतून पर्यटकांना तेथपर्यंत जावे लागेल. त्या नंतर सिंहगडाची प्रतिकृती साकारली जाणार असून तीन शक्तीपीठांचीही प्रतिकृती शिवसृष्टीत असेल. या ठिकाणी एक अँम्पीथिएटर देखील उभारली जाणार आहे.
 
तटबंदी व बुरुजांची रचना...
संपूर्ण शिवसृष्टीभोवती किल्ल्याच्या धर्तीवरची तटबंदी व बुरुजांची रचना केली जाणार असून विशेष म्हणजे पर्यटकांना या तटबंदीवरुन पूर्ण पणे चालतही फिरता येऊ शकेल. शिवसृष्टी पाहून संपल्यानंतर स्वताः शिवाजी महाराज सर्वांशी संवाद साधून एक सामाजिक संदेश देतील, आणि तेथे या शिवसृष्टीची सफर संपेल. मुंबईचे प्रसिध्द रचनाकार नितीन कुलकर्णी यांनी शिवसृष्टीचे डिझाईन साकारले आहे.

दृष्टीक्षेपात बारामतीची शिवसृष्टी
·        25 एकरांच्या जागेवर प्रकल्प आकार घेणार
·        रायगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, पुरंदर, सिंहग़ड आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती
·        महाराजांची राजसदर साकारणार
·        सिंधुदुर्गाची प्रतिकृती पाण्यात तयार होणार
·        थ्रीडी इफेक्टस व लेझर शो साकारणार
·        भव्य महाप्रवेशद्वार व दगडी पाय-या होणार
·        मावळ्यांच्या वेशात माहिती देणार गाईड
·        महाराजांचा राज्याभिषेक लेझर शोमधून दाखविला जाणार.
·        प्रकल्पाला तटबंदी व बुरुज यावरुन चालताही येणार.
·        तीन शक्तीपीठांच्या प्रतिकृतीही साकारणार

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com