अजितदादांचे पुन्हा ‘मैं हूँ ना’ : रश्मी बागलानंतर भगिरथ भालकेंच्या पाठीशी लावली ताकद 

जाहीर आव्हान देऊन एखाद्याला पराभूत करणे, ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची खासियत आहे.
Ajit Dada's 'Main Hoon Na' again: Power behind Bhagirath Bhalke after Rashmi Bagal
Ajit Dada's 'Main Hoon Na' again: Power behind Bhagirath Bhalke after Rashmi Bagal

सोलापूर : ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील बोले आणि सोलापूर जिल्हा हाले ही एकेकाळची राजकीय स्थिती होती. करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 2007 मध्ये मोहिते-पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला अजितदादांनी पहिला धक्का दिला. ‘मैं हूँ ना’ म्हणत अजितदादांनी या निवडणुकीत थेट लक्ष घालत रश्‍मी बागल यांच्या पाठीशी ताकद उभा केली होती. प्रस्थापित विरुध्द नवखे अशीच ती लढाई झाली होती. त्यानंतर आता तब्बल 14 वर्षांनंतर ‘मैं हूँ ना’ म्हणत अजितदादांनी पुन्हा एकदा भगीरथ भालके यांच्या पाठीशी आपली ताकद उभा केली आहे. 

राजकारणात दिलेला शब्द पाळणे आणि जाहीर आव्हान देऊन एखाद्याला पराभूत करणे, ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची खासियत आहे. ‘तुला यंदा दाखवतोच, तू कसा आमदार होतो ते', उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिलेले आव्हान महाराष्ट्राने पाहिले. पुरंदरमध्ये शिवतारे यांना पराभूत करण्याचे आव्हान अजित पवारांनी दिला आणि ते खरेही करुन दाखविले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचंड लक्ष घातले आहे. (कै.) भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेली पंढरपूरची जागा सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे अत्यंत चुरशीने लढविली जात आहे. अवघ्या 15 दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरसाठी तब्बल चार दिवस दिले आहेत. 

सहानुभूतीला अजित पवारांच्या इच्छाशक्तीची जोड

मंगळवेढ्यातील 35 गावांचा पाणीप्रश्‍न आणि पंढरपूर तालुक्‍यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची स्थिती हे दोन प्रश्‍न सध्या भगीरथ भालके यांच्यासाठी व पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी महत्वाचे आहेत. हे दोन्ही प्रश्‍न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावोगावी जाऊन शब्द दिला आहे. (कै.) भारत भालके यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांच्याबद्दल तयार झालेल्या सहानुभूतीला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इच्छाशक्तीची व विकासाच्या दृष्टीची जोड मिळाली आहे. त्याचा मोठा लाभ या निवडणुकीत भगीरथ यांना होण्याची शक्‍यता आहे. 

संजय शिंदेंवर जबाबदारी

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची 2007 मध्ये झालेली निवडणूक असो की आता 2021 मध्ये होत असलेली पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणूक, या दोन्ही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून आमदार संजय शिंदे ही जबाबदारी पार पाडत आहेत, हे विशेष. आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरा-मोहरा बदलेल. पंढरपूरच्या निवडणूक निकालानंतरही जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. 


पंढरपूरच्या आमदारकीचा इतिहास कायम राहणार की बदलणार?

पंढरपूर मतदार संघाची आमदारकी 1948 ते 2020 पर्यंत एकूण 8 जणांना मिळाली आहे. आतापर्यंत आमदार झालेल्या नेत्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींकडे पुन्हा आमदारकी आली नसल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. भाई राऊळ यांच्या निधनाने 1958 मध्ये पंढरपुरात पोटनिवडणूक झाली. त्यांच्या घरातील सदस्यांनी ही निवडणूक लढविली नाही. त्यानंतर तब्बल 63 वर्षांनी भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत (कै.) भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके व त्यांच्या विरोधात भाजपचे समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पंढरपूरच्या आमदारकीचा वारसा पुन्हा त्या कुटुंबाला मिळत नसल्याचा इतिहास आहे. या निवडणुकीत आमदार पुत्र म्हणून भगीरथ भालके पहिले आमदार होत इतिहास बदलणार की समाधान आवताडे आमदार होत पंढरपूरच्या आमदारकीचा इतिहास कायम ठेवणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com