पिंपरी-चिंचवड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आमच्या तिघांपैकी एकाला करा

विद्यमान अध्यक्षांच्या विरोधी गटातील तिघांनी आमच्यापैकी कुणालाही अध्यक्ष करा, ते आम्हा तिघांनाही चालेल,असे या मुलाखतीत सांगितल्याने ती घेणारे पक्षाचे सरचिटणीस आणि शहर प्रभारी यांच्यासमोर काही काळ पेच निर्माण झाला होता.
 पिंपरी-चिंचवड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आमच्या तिघांपैकी एकाला करा
Congress PCMC City Chief Aspirants Interview

पिंपरी : कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदासाठी १६ जण इच्छूक दिसले. त्यांच्या आज मुलाखती झाल्या. मात्र, अध्यक्ष कोण याचा निर्णय लगेच होऊ शकला नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तो घेणार आहेत. त्यामुळे नवीन अध्यक्ष मिळतो की जुन्यांनाच पुन्हा कंटिन्यू केले जाते,यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, विद्यमान अध्यक्षांच्या विरोधी गटातील तिघांनी आमच्यापैकी कुणालाही अध्यक्ष करा, ते आम्हा तिघांनाही चालेल,असे या मुलाखतीत सांगितल्याने ती घेणारे पक्षाचे सरचिटणीस आणि शहर प्रभारी यांच्यासमोर काही काळ पेच निर्माण झाला होता.

विधानपरिषदेवर संधी न दिल्याने सचिन साठे यांनी ११ नोव्हेंबरला राजीनामा दिल्याने या मुलाखती झाल्या. मात्र,त्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांनी अद्याप मंजूर केलेला नाही. तरीही या मुलाखती झाल्याने त्या फार्स,तर ठरणार नाही ना अशीही चर्चा मुलाखतीच्या ठिकाणी ऐकायला मिळाली. विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पक्ष कार्यालयाऐवजी पक्षाच्या शहर उपाध्यक्षांच्या प्रशस्त निवासस्थानी या मुलाखती झाल्या. कैलास कदम,अशोक मोरे आणि मनोज कांबळे यांनी काहीसे शक्तीप्रदर्शन करीत एकत्रच दिली. 

आमच्यापैकी एकाला अध्यक्ष करा,ते आम्हाला चालेल,अशी मागणी त्यांनी उभ्या उभ्या दिलेल्या मुलाखतीत केली.पक्ष वाढीसाठी श्रेष्ठींनी लक्ष देणे गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका निवडणुकीपूर्वी शहरातील सर्वच्या सर्व १२८ वॉर्डात ताकद निर्माण केली पाहिजे,असे ते म्हणाले.विष्णू नेवाळे, तुकाराम भोंडवे, संदेश नवले, दिलीप पांढरकर, सुनील राऊत,सुंदर कांबळे, अशोक काळभोर,सचिन कोरे, अभय भोरे,विजय चौधरी, सरिता जमनीक,यशराज पारखी या इतर इच्छूकांच्या वैयक्तिक मुलाखती झाल्या. पक्षाचे शहर निरीक्षक व प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा,शरद आहेर आणि मेहूल व्होरा यांनी मुलाखत घेताना अध्यक्षपद मिळाले,तर काम कसे करणार, आगामी पालिका निवडणूक कशी लढणार, पदवीधर निवडणुकीविषयी काय वाटते, या निवडणुकीत काय भूमिका असेल,पक्षवाढीसाठी काय करणार असे प्रश्न इच्छुकांना विचारले.

मुलाखतींचा तपशील प्रदेशाध्यक्षांना देण्यात आला असून तेच याबाबत निर्णय घेतील,असे या मुलाखतींनतर शर्मा यांनी सरकारनामाला सांगितले. शहराच्या २५ पदाधिकाऱ्यांनी साठे यांनाच पदावर कायम ठेवावे,अशी मागणी यावेळी केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पक्षाला नवा अध्यक्ष मिळतो की जुनाच कायम राहतो,याची उत्कंठा शहरातील कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. दुसरीकडे साठे हे राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून आले आहे.साठेनंतर शहर महिलाध्यक्षासह पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही पक्षश्रेष्ठी हे शहर कॉंग्रेस व पदाधिकाऱ्यांना सतत डावलत असल्याचा आरोप करीत एकत्रित राजीनामे दिले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in