अमित शहांनी राज्यातील सहकाराला त्रास दिल्यास आम्हीही कार्यक्रम करू  - Sanjay Raut warns Amit Shah from Co-operation Ministry | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहांनी राज्यातील सहकाराला त्रास दिल्यास आम्हीही कार्यक्रम करू 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

सहकार हा राज्याचा विषय असून त्यावर केंद्राने केलेले हे अतिक्रमण म्हणजे लोकशाही व संघराज्याला धोका आहे.

पिंपरी : केंद्रातील नव्या सहकार मंत्रालयाने जर महाराष्ट्रातील सहकार चळवळीला त्रास देण्याचा कार्यक्रम केला, तर आम्हालाही कार्यक्रम करता येतो, असा इशारा शिवसेनेचे फायर ब्रॅंड नेते, पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार व त्यातही नवे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना आज (ता. ९ जुलै) पिंपरी-चिंचवडमध्ये दिला. (Sanjay Raut warns Amit Shah from Co-operation Ministry)

पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या आढावा बैठकीनंतर खासदार राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी स्थानिक, राज्य व राष्ट्रीय मुद्यांवर रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले की, राज्यातील सरकार व सहकाराला त्रास देण्यासाठी, त्यांची कोंडी करण्याकरिता जर केंद्र सरकारने सहकार खाते निर्माण केले असेल तर तो परत एक सत्तेचा गैरवापर आहे. कारण, सहकार हा राज्याचा विषय असून त्यावर केंद्राने केलेले हे अतिक्रमण म्हणजे लोकशाही व संघराज्याला धोका आहे. मात्र, जर सहकार मजबूत करण्यासाठी केंद्राने हे सहकार खाते निर्माण केले असेल, तर त्याचे आम्ही स्वागतच करतो. 

हेही वाचा : प्रसाद लाड यांचा घोटाळा मंत्रालयात पोचलाय; लवकरच चौकशी लावू 

ईडी व सीबीआय या केंद्रीय यंत्रणाचा सूडबुद्धीने आणि द्वेषाने वापर करीत महाराष्ट्रातील राजकारण बिघडवले जात असून दहशत निर्माण करण्यात येत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. पण, हे फार काळ चालत नाही. अशी दहशत निर्माण करणाऱ्या नेत्यांचे नामोनिशाण मिटलेले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केंद्रीय यंत्रणांकडे फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचेच पत्ते आहेत का, अशी विचारणा करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीत भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीने केलेला घोटाळा त्यांना दिसत नाही का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा : राज्यात ५५ आमदारांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर ५० नगरसेवकांवर महापौर का होणार नाही?

राज्यातील दोन्ही राजांना (उदयनराजे आणि संभाजीराजे) नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान का दिले नाही, हा प्रश्न त्यांच्या समर्थकांनी पंतप्रधान मोदींना विचारायला हवा, असेही खासदार राऊत म्हणाले. 

राणे यांना त्यांच्या उंचीपेक्षा कमी महत्वाचे खाते मिळाले. या राऊतांच्या विधानावर नारायण राणे यांनी राऊत वाईटच बोलतात असे वक्तव्य केले होते. त्यावर असे एखादे, तरी आपले स्टेटमेंट दाखवा. पुन्हा बोलणार नाही, असे आव्हान राऊतांनी दिले. अनेक पक्ष फिरून आलेले व राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले तसेच शिवसेनेत असताना गरुडझेप घेतलेल्या राणेंना महत्वाचे पद मिळाले असते, तर महाराष्ट्र धन्य झाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला. तरीही ते दिलेल्या खात्यावरही आपली छाप पाडतील, असे सांगत राणेंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

विधानसभा अध्यक्ष निवडीवरून महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. हे पद कॉंग्रेसकडे असल्याने, अध्यक्षपदी कोणाला बसवायचे, ते  कॉंग्रेस पक्षाचे नेते ठरवतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख