राहुल गांधींना आठवलेंनी दिला 'हम दो, हमारे दो' चा सल्ला... - Rahul Gandhi advice of Hum do hamare do Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधींना आठवलेंनी दिला 'हम दो, हमारे दो' चा सल्ला...

उत्तम कुटे
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

राहूल गांधींच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत आठवले यांनी मोदी, शहांची पाठराखण केली.

पिंपरी : केंद्रीय अर्थसंकल्पाचा समाचार घेताना तो हम दो (मोदी, शहा) और हमारे दो (अंबानी, अदानी) असा असल्याची टीका कॉंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी लोकसभेत केली होती. मात्र, त्यांचा हा नारा त्यांच्याच उपयोगाचा असून त्यांनीच हम दो, हमारे दो करावे, असा सल्ला राहूल गांधींना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिला. राहूल गांधींच्या या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत आठवले यांनी मोदी, शहांची पाठराखण केली.

शेतकरी आंदोलनाला गांधी यांनी चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आठवले यांनी यावेळी केला. या आंदोलनावरून एकवटलेले विरोधक मोदींना नाहक टार्गेट करीत असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षापर्यंत नव्या शेतकरी कायद्याची अंमलबजावणी होणार नसल्याचे सांगितले. दुसरीकडे त्यात दुरुस्तीची तयारी केंद्राने दाखविली असताना हे आंदोलन चालू ठेवणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आम्हीही आंदोलने केली, पण एवढा त्रास दिला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या आंदोलनाला चीन व पाकची फूस असल्याचा दावा, मात्र त्यांनी फेटाळला.

मुंबई महापालिका जिंकण्याच्या कामाला लागलो असून तेथे पुढील महापौर भाजपचा, तर उपमहापौर आरपीआयचा असेल, अशी भविष्यवाणी आठवलेंनी वर्तवली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आरपीआयचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. फक्त मराठा समाजाला ओबीसीत न टाकता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणाची मागणी राज्यात मीच प्रथम केल्याचा दावाही त्यांनी केला. मराठ्यांबरोबर देशातील गरीब राजपूत, जाट, ठाकूर, रे्ड्डी यांनाही दहा ते बारा टक्के आरक्षण देण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. २०२१ ची जनगणना ही जातीनिहाय करावी, जेणेकरून प्रत्येक जातीची लोकसंख्या कळेल, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे जातीयवाद वाढणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये आपल्या मंत्रालयाला झुकते माप मिळून त्यात दलित कल्याणासाठी सव्वा लाख कोटी रुपयांची तरतूद झाल्याची माहिती त्यांनी दिली. किरकोळ दलित अत्याचाराच्या घटना वगळता दलितांना पाठिंबा देणाऱ्या सवर्णांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख