कोण होणार गाव कारभारी? सदस्यांचा जीव टांगणीला

पुणे जिल्ह्यातील चौदाशे गावांचे कारभारी कोण हे उद्या (ता.२९) ठरणार आहे. कारण या गावांतील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. दरम्यान,नुकतीच (ता.१५) निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींसह ती होणाऱ्या गावांतील सरपंचपदाचीही सोडत उद्याच काढली जाणार आहे.
कोण होणार गाव कारभारी? सदस्यांचा जीव टांगणीला
Leaders awaiting Sarpanch Post Reservation

पिंपरी : पुणे जिल्ह्यातील चौदाशे गावांचे कारभारी कोण हे उद्या (ता.२९) ठरणार आहे. कारण या गावांतील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. दरम्यान,नुकतीच (ता.१५) निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींसह ती होणाऱ्या गावांतील सरपंचपदाचीही सोडत उद्याच काढली जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तेथील तहसीलदार सोडत काढणार आहेत. १३ तालुक्यांसाठी असे १३ उपजिल्हाधिकारी नेमण्यात आले आहेत. मावळ तालुक्यात संदेश शिर्के यांची नेमणूक झाली आहे. तेथील सोडत साडेअकरा वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये काढली जाणार आहे. मावळ तालुक्यातील ५७ ग्रामंपंचायतींची १५ डिसेंबरला निवडणूक झाली. मात्र, त्यासह भविष्यात निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींसह तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १०३ ग्रामपंचायतींसाठी उद्याच सोडत काढली जाणार असल्याचे मावळचे तहसीलदार मधूसुदन बर्गे आणि नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.

पूर्वी ही सोडत ८ डिसेंबरला निवडणुकीपूर्वी काढण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र, वेळेत जातपडताळणी न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे, बनावट जात दाखला सादर झाल्याने निवडणूक रद्द होऊन ती पुन्हा घ्यावी लागणे या बाबी विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने आपला पूर्वीचा निर्णय रद्द केला आणि ही सोडत निवडणुकीनंतर काढायचे ठरवले. त्यामुळे गैरप्रकार होणार नाहीत आणि योग्य व्यक्तीला न्याय मिळेल,अशी शासनाची भूमिका त्यामागे आहे.

आता ती उद्या निघणार असून त्याकडे निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या पॅनेलप्रमुख असलेल्या विविध स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. बहूमत मिळाले असले,तरी आरक्षणाचा फासा आपल्या बाजूने पडावा,यासाठी ते देव पाण्यात घालून बसले आहेत. तर, ग्रामपंचायतीत सत्ता नसली,तर आरक्षणाचा कौल मिळाला,तर बहूमत नसलेल्या पॅनेलचा सदस्य वा पॅनेलशिवाय निवडून आलेला एकटादुकटा सदस्यही सरपंच होणार असल्याने त्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in