पृथ्वीराज साठेंना पदोन्नती, सचिन साठेंची मात्र गच्छंती!

देश कॉंग्रेसचे सरचिटणीस असलेले पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलखचे पृथ्वीराज यांना दोन दिवसांपूर्वी पक्षाचे अखिल भारतीय सचिव म्हणून प्रमोशन दिले. मात्र,त्याचा शहर पक्षात आनंद नसून उलट खेद व संतापही आहे
पृथ्वीराज साठेंना पदोन्नती, सचिन साठेंची मात्र गच्छंती!
Prithviraj Sathe - Shamala Sonawne - Sachin Sathe

पिंपरी : एखाद्या पदाधिकाऱ्याला बढती मिळाली,तर पक्षात आनंद पसरतो.मात्र, तसे पृथ्वीराज साठे यांच्याबाबतीत झालेले नाही. प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस असलेले पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलखचे पृथ्वीराज यांना दोन दिवसांपूर्वी पक्षाचे अखिल भारतीय सचिव म्हणून प्रमोशन दिले. मात्र,त्याचा शहर पक्षात आनंद नसून उलट खेद व संतापही आहे.

कारण त्यांना न्याय देताना शहरातील पिंपळे निलखचेच दुसरे साठे म्हणजे पक्षाचे शहराध्यक्ष सचिन साठे या २४ वर्षापासून पक्षाची एकनिष्ठ सेवा करणाऱ्या पदाधिकाऱ्याला,मात्र डावलले गेले आहे. दोन्ही साठे एकमेकांचे चुलतभाऊ आहेत.

सतत डावलले गेल्याने अखेर साठे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा गेल्या महिन्यात ११ तारखेला दिला. त्यानंतर शहराच्या पाच पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिले. ते अद्याप मंजूर झालेले नाहीत.तसेच साठे यांचे पुनर्वसनही केले गेलेले नाही.असे असताना पृथ्वीराज साठेंना,मात्र बढती दिल्याने सचिन साठेंचे समर्थक संतप्त झाले आहेत. 

एकनिष्ठ व काम करणाऱ्यांना डावलून हांजीहांजी करणाऱ्याला संधी मिळत असेल,तर पक्षाचे काही खरे नाही,असा घरचा आहेर कॉंग्रेसला पक्षाच्या माजी महिला प्रदेश अध्यक्षा व माजी अखिल भारतीय महिला प्रदेश सचिव श्यामला सोनवणे यांनी दिला. खऱ्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल या ज्येष्ठ माजी पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.पक्षात एकनिष्ठांवर अन्याय होत असल्याकडे त्यांनी पुन्हा लक्ष वेधले.

प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर शहरात कमजोर झालेल्या पक्षाला जिवंत ठेवणाऱ्या सचिन साठेंची दखल न घेता पृथ्वीराज‌ साठेसारख्या स्थानिक पातळीवर पक्षाला कुठलीही ताकद न देणाऱ्या,आपली कातडी कधीही काळी पडू न देणाऱ्या आणि स्थानिक पातळीवर पक्ष उमेदवारांच्या विरोधात काम करुन‌ पक्ष कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पक्षाचा अखिल भारतीय पदाधिकारी बनविणे हा खऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय आहे,असा घरचा आहेर सोनवणेंनी दिला आहे. 

वरिष्ठ नेत्यांशी सतत सलगी ठेऊन पक्षाची पदे मिळवणे एवढेच काम पृथ्वीराज साठेंनी केले आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. पक्षातील असे काही जण वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून पदे पदरात पाडून घेत असल्याने सचीन साठेसारख्यांवर अन्याय होत आहे,अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात उपस्थिती,सहभाग नसतांना नेत्यांच्या सोईनुसार त्यांची हाजी हाजी करणाऱ्याला खऱ्या कार्यकर्त्याऐवजी संधी देण्याचा हा वरिष्ठांचा हा निर्णय मनमानी असून तो एकनिष्ठांना संपवणारा असल्याची तोफही त्यांनी डागली.असेच होत राहिले,तर शहर कॉंग्रेसची स्थिती कधीही सुधारणार नाही,असेही त्यांनी सुनावले आहे. पक्षाचे काही होवो, माझे महत्व वाढले पाहिजे यासाठी पदे मिळवणाऱ्यांकडे पक्षाने लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in