पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेवकांना पदवीधरसाठी प्रदेशाध्यक्षांचे मतांचे टार्गेट - Chandrakant Patil Gives Target to PCMC Coporators for Graduate Elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेवकांना पदवीधरसाठी प्रदेशाध्यक्षांचे मतांचे टार्गेट

उत्तम कुटे
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात आम्हीच उमेदवार असल्याचे समजून काम करू आणि विजय खेचून आणू,अशी ग्वाही पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार महेश लांडगे (भोसरी) आणि लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना काल रात्री दिली.

पिंपरीः विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात आम्हीच उमेदवार असल्याचे समजून काम करू आणि विजय खेचून आणू,अशी ग्वाही पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार महेश लांडगे (भोसरी) आणि लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना काल रात्री दिली. विजयाला कारणीभूत पिंपरी-चिंचवड असेल,असा आत्मविश्वासही या शहर कारभाऱ्यांनी व्यक्त केला.या मतदारसंघातील तयारीसाठी शहरातील नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते.

ही लढत आपल्या प्रतिष्ठेच्या केलेल्या चंद्रकांतदादांनी येथे विजयाची हॅटट्रिक नोंदविण्यासाठी नगरसेवकांना मतांचे टार्गेटच १ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी यावेळी दिले.प्रचाराचे पुढील नियोजन व प्रचार यंत्रणा याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपला उमेदवार तरुण आहे,यावर भर देण्यास बैठकीस सांगण्यात आल्याची माहिती तिला उपस्थित असलेल्या एका नगरसेवकाने सरकारनामाला दिली. माझ्या विजयात ‘टीम पिंपरी-चिंचवड’चा मोलाचा वाटा असेल, असा विश्वास पक्षाचे पदवीधरमधील पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला. पक्षाचे पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवारही यावेळी उपस्थित होते. पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची अशी एकत्रित बैठक दिवाळीनंतर पुन्हा शहरात होणार आहे.

दरम्यान, तब्बल तब्बल अडीच तास ही बैठक उशीरा सुरु झाल्याने त्यासाठी आलेल्या काही नगरसेविकांनी दिवाळीच्या तयारीसाठी काढता पाय घेतला.पुण्यातील अशी पश्चिम महाराष्ट्रासाठीची तयारीची व नंतर संघाची अशा दोन बैठकांमुळे चंद्रकांतदादांना या बैठकीला येण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात आले.

महापौर माई ढोरे, प्रदेश महिला अध्यक्षा उमा खापरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाकेआदी यावेळी व्यासपीठावर होते.शहरात राबवलेल्या मतदार नोंदणी अभियानाबद्दल चंद्रकांतदादा आणि उमेदवार देशमुख यांच्या हस्ते शहर नोंदणीप्रमुख तथा शहर सरचिटणीस अमोल थोरात, राजू दुर्गे,मोरेश्वर शेडगे आणि विजय फुगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहर जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले. आभार सरचिटणीस फुगे यांनी मानले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख