पिंपरी : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील प्रचारात आता रंगत येऊ लागली आहे, राष्ट्रवादीच्या परवा झालेल्या अजित पवार यांच्या मेळाव्यानंतर आता उद्या (ता.२५) भाजपचा असा पदाधिकारी,कार्यकर्ता मेळावा होत असून त्यात माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शिरूरचे पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती.शरद पवार यांच्यावर पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना शेतातील ढेकळाने हिमालयाशी तुलना करु नये,असा हल्लाबोल कोल्हेंनी केला होता.त्याचा समाचार फडणवीस हे परवाच्या आपल्या भाषणात घेतील,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
नमूद करण्याजोगी बाब म्हणजे दोन्ही टीकेचे मैदान एकच आहे. कारण भाजपचा मेळावा होत असलेल्या पीचवरच (ठिकाण) कोल्हेंनी दमदार बॅटिंग केली होती. त्याच मैदानावर फडणवीस परवा कसे खेळतात,याकडे शहराचे लक्ष आतापासूनच लागले आहे.दोन्ही सामन्यांची (मेळावा) वेळ सुद्धा एकच म्हणजे सकाळी दहा वाजताची आहे.
पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षकचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ हा मेळावा होत आहे.पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते नामेदव ढाके यांनी दिली.
Edited By - Amit Golwalkar

