वाशी : नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेल्या १४ गावांना पुन्हा समाविष्ट करून घेण्यास महापालिका सक्षम आहे; परंतु शिवसेनेचे फोडाफोडीचे राजकारण या गावांतील नागरिकांना विकासापासून दूर ठेवण्यास कारणीभूत ठरत आहे, असा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला.
नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आल्यानंतर १४ गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. ही गावे भकास बनली आहेत. वगळलेली १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावी, यासाठी येथील १४ गावांच्या सर्वपक्षीय विकास समितीची बैठक गुरुवारी देसाई गांव येथे झाली. या वेळी नाईक बोलत होते. या वेळी माजी खासदार संजीव नाईक, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, वंडार पाटील, आमदार गणपत गायकवाड, नगरसेवक बाबाजी पाटील, सुखदेव पाटील, युवा नेते सुमित भोईर उपस्थित होते.
मित्र पक्ष म्हणून भाजपबरोबर सत्तेत असताना आणि आताही महाविकास आघाडीसोबत सत्तेत असताना शिवसेनेने या वगळलेला १४ गावांना न्याय मिळवून दिलेला नाही. किमान आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गावांबाबत योग्य निर्णय घ्यावा आणि या ग्रामस्थांना विकासापासून वंचित ठेवू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
निवडणुकीवर बहिष्कार; सर्व पक्षांचा पाठिंबा
१४ गावातील ग्रामस्थांनी यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीवर दोन वेळा सर्वपक्षीय विकास समितीच्या आवाहनानुसार बहिष्कार टाकला होता. येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत न्याय न मिळाल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला आहे. या बहिष्काराला भाजप, मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तूर्तास शिवसेनेनेदेखील पाठिंबा दर्शवला आहे.
६०० कोटीची तरतूद : संजीव नाईक
नवी मुंबई महापालिकेने महासभेत या १४ गावांना समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करून सरकारदरबारी पाठवला आहे. या गावांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना नवी मुंबईत सामावून घेण्यासाठी कोणतीही अडचण नाही, अशी भूमिका आमदार गणेश नाईक यांनी वेळोवेळी मांडली आहे. या गावांच्या विकासासाठी ४०० ते ६०० कोटी रुपयांची तरतूद पालिकेकडून करण्यात आल्याची माहिती माजी खासदार संजीव नाईक यांनी दिली आहे.
Edited By- Amit Golwalkar

