धक्कादायक : रक्षकांनाच होताहेत 'स्वप्नपूर्ती'चे दरवाजे बंद - No Entry to CISF Personnel in Navi Mumbai Housing Complex | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : रक्षकांनाच होताहेत 'स्वप्नपूर्ती'चे दरवाजे बंद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 जून 2020

खारघर सेक्‍टर 36 येथे सिडकोने तब्बल साडेतीन हजार घरांची अल्प उत्पन्न व अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी भव्य गृहसंकुल उभारले आहे. या सोसायटीतील वाटप झालेल्या घरांपैकी 60 टक्के खोल्या मालकांनी भाड्याने दिल्या आहेत. यात प्रामुख्याने सीआयएसएफ जवानांच्या कुटुंबांचा अधिक समावेश आहे.

खारघर  : देशातील महत्त्वाचे केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे प्रकल्प, कारखाने आणि विमानतळांचेसंरक्षण करणाऱ्या सीआयएसएफच्या जवानांना नवी मुंबईतील सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत विरोध केला जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे कारण पुढे करून तब्बल 500 कुटुंबांना भाड्याचे घर न देण्याचा फतवा स्वप्नपूर्ती सोसायटीतील काहींनी काढला आहे. एवढेच नव्हे तर सध्या राहत असणाऱ्या जावानांचे करार संपल्यानंतर तत्काळ बाहेर काढण्याची तयारी काही स्वयंघोषित समाजसेवकांनी केली आहे.

खारघर सेक्‍टर 36 येथे सिडकोने तब्बल साडेतीन हजार घरांची अल्प उत्पन्न व अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी भव्य गृहसंकुल उभारले आहे. या सोसायटीतील वाटप झालेल्या घरांपैकी 60 टक्के खोल्या मालकांनी भाड्याने दिल्या आहेत. यात प्रामुख्याने सीआयएसएफ जवानांच्या कुटुंबांचा अधिक समावेश आहे. तळोजा एमआयडीसीतील काही महत्त्वाचे प्रकल्प, ओएनजीसी, जेएनपीटी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशांच्या सुरक्षेची जबाबदारी 'सीआयएसएफ'कडे आहे. या ठिकाणांपासून खारघर जवळ असल्याने जवान स्वप्नपूर्ती सोसायटीत राहतात. 

नवा करार न करण्याचा फतवा

सोसायटीतील तब्बल 500 घरांमध्ये ही कुटुंब भाडेकरार करुन वास्तव्यास आहेत. सोसायटीत राहणाऱ्या मालकांव्यतिरिक्त या कुटुंबांतील जवानांमुळे सोसायटीत कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी भीती सोसायटीतील काही जणांना वाटते आहे. त्यामुळे त्यांनी थेट सीआयएसएफच्या जवानांविरोधात मोहिम उघडली असून, घरे खाली करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. ज्या घरमालकांनी सीआयएसएफच्या जवानांना घरे दिली आहेत, त्यांना करार संपल्यानंतर पुन्हा नवा करार न करण्याच्या तसेच नवीन भाडेकरू म्हणून सीआयएसएफच्या जवानांना घर भाड्याने न देण्याचा फतवा जारी केला आहे.

काही व्यक्तींची मनमानी 

सीआयएसएफच्या जवानांना स्वप्नपूर्ती सोसायटीत नव्याने घर भाड्याने राहण्यास देण्याची परवानगी देऊ नये, याकरिता सीआयएसएफचे मुख्यालय, सिडको व नवी मुंबई पोलिसांना तसे लेखी पत्र देण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांनंतरही सिडकोने अद्याप स्वप्नपूर्ती सोसायटीची अधिकृत सोसायटी स्थापन केलेली नाही. गेल्या वर्षभरापासून काही जणांना  हाताशी घेऊन सोसायटी स्थापन करण्याच्या नाममात्र हालचाली सुरू झाल्या आहेत. सोसायटी अधिकृत व्यक्तींच्या नियंत्रणात नसल्याने काही लोकांची मनमानी सुरू आहे. 

स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये अद्याप ऍडहॉक कमिटी नेमलेलीच नाही. सध्या बॅंक खाते उघडण्यासाठी प्रवर्तक नेमले आहेत. त्यांना खाते उघडण्यापलीकडे कसलेही अधिकार नाहीत. तसेच इतर कोणालाही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार प्राप्त झालेले नाहीत. सोसायटीत राहणाऱ्या मालकाच्या घरात कोण भाडोत्री राहील अथवा नाही हा त्या घरमालकाचा अधिकार आहे. या अधिकारात सोसायटी हस्तक्षेप करू शकत नाही - केदारी जाधव, सहनिबंधक सहकारी सोसायटी, सिडको 

स्वप्नपूर्ती सोसायटीतील घरांमध्ये स्वतः मालकांव्यतिरिक्त इतर भाडेकरूंनी राहू नये, अशी सिडकोची अट आहे. त्या अटींनुसार आम्ही सोसायटीतील घरे भाड्याने कोणालाही देऊ नका, अशी मागणी केली आहे. सध्या सोसायटीत सीआयएसएफ व इतर नागरिक असे दोन हजारांहून अधिक भाडेकरू राहत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन घरमालकांनी घरे भाड्याने देऊ नये, असे पत्र आम्ही सिडकोला दिले आहे - भगवान केशभट, स्वप्नपूर्ती सोसायटी सदस्य

कायद्यानुसार एखाद्या जमातीला अथवा एखाद्या ठिकाणी कामाला असणाऱ्या ठराविक लोकांना वास्तव्यास मनाई करणे अपराध आहे. भाडेकरू ठरवण्याचा अधिकार घरमालकाला आहे. भाडेकरू चुकीचे कृत्य करीत असल्यास त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करू शकता. संपूर्ण समूहाला जबाबदार धरणे गैर आहे - अरुण भिसे, अध्यक्ष, सिटीझन युनिटी फोरम पनवेल

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख