The word ‘Rikamchot’ is not unparliamentary : mangesh chavan | Sarkarnama

'रिकामचोट' हा शब्द असंसदीय नव्हे; शिवसेनेकडून त्याचा बाऊ कशाला? 

कैलास शिंदे
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

'रिकामचोट' म्हणजे ज्याच्याकडे खूप वेळ आहे. हा शब्द असंसदीय किंवा शिवराळ नाही. खानदेशात बोली भाषेत हा शब्द कायमच सहजगत्या वापरला जातो. त्यात एवढं बाऊ करण्याचे कारण काय, असा प्रतिसवाल चाळीसगावचे भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शिवसेनेला केला आहे. 

जळगाव : 'रिकामचोट' म्हणजे ज्याच्याकडे खूप वेळ आहे. हा शब्द असंसदीय किंवा शिवराळ नाही. खानदेशात बोली भाषेत हा शब्द कायमच सहजगत्या वापरला जातो. त्यात एवढं बाऊ करण्याचे कारण काय, असा प्रतिसवाल चाळीसगावचे भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शिवसेनेला केला आहे. 

भारतीय जनता पक्षातर्फे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी "रिकामचोट मुख्यमंत्री' असा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केला होता. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले होते. त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. चाळीसगाव येथे त्यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोर्चा काढून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. आमदार चव्हाण यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. 

"मुख्यमंत्री पदावर जी व्यक्ती असते, तिला एक मिनीटही फुरसत नसते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भरपूर वेळ आहे. ते मुंबई ते पुणे अडीच तासाचा प्रवास स्वत:गाडी चालवून करत असतात. एवढा रिकामचोट मुख्यमंत्री इतिहासात पहावयास मिळाला नाही,' अशी टीका आमदार चव्हाण यांनी केली होती. 

याबाबत "सरकारनामा'ने आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की रिकामचोट हा शब्द परवा झालेल्या दूध दरवाढ आंदोलनात मी उद्विग्नपणे वापरला आहे. हा अससंदीय किंवा शिवराळ शब्द नाही. खानदेशातील बोलीभाषेत हा शब्द बोलण्याच्या ओघात कायमच सहजगत्या वापरला जातो. "रिकामचोट' म्हणजे ज्याच्याकडे खूप वेळ आहे असा. 

"राज्यात "कोरोना' या साथीच्या आजाराची गंभीर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची मका खरेदी होत नाही. दिवसभर पावसात उभे राहून शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही. व्यापारी, उद्योजक व सर्वसामान्य जनता आज हवालदिल झाली आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात पाय ठेवत नाहीत. "व्हिडिओ कॉन्फरसिंग'द्वारे राज्य चालते काय?, असा प्रश्‍न चव्हाण यांनी उपस्थित केला. 

मी मागील चार महिन्यांत मुख्यमंत्री यांना अनेक पत्र देवून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न मांडले. मात्र, त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री मात्र स्वत: गाडी चालविणे, विनोदी मुलाखती देणे, यात व्यस्त आहेत. मी मतदार संघातील पाच लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे परवा झालेल्या आंदोलनात मी उद्विग्नपणे "रिकामचोट' हा शब्द वापरला. त्यात एवढे बाऊ करण्याचे कारण काय? असे चव्हाण म्हणाले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख