Vishwas Nangre Patil Says Nashik Police Response Time is Six Minutes
Vishwas Nangre Patil Says Nashik Police Response Time is Six Minutes

काय म्हणता? गुन्हा घडल्यास नाशिक पोलिसांचा रिसपॉन्स टाइम सहा मिनिटे!

गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी अतिशय बारीक नियोजन केले आहे. शहरात एखादा गुन्हा घडला तर आमच्या पोलिसांचा रिसपॉन्स टाइम पाच ते सहा मिनिटे आहे. त्यामुळे गुन्हेगारी, खून आणि अपघात सगळेच नियंत्रणात आले आहे, असा दावा नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केला

नाशिक : गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी अतिशय बारीक नियोजन केले आहे. शहरात एखादा गुन्हा घडला तर आमच्या पोलिसांचा रिसपॉन्स टाइम पाच ते सहा मिनिटे आहे. त्यामुळे गुन्हेगारी, खून आणि अपघात सगळेच नियंत्रणात आले आहे, असा दावा पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केला आहे. 

आयुक्त नांगरे-पाटील एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, ''नाशिक हे प्रगतिशील शहर आहे. कायद्याचे पालन करणारे नागरिक येथे आहेत. त्यादृष्टीने या शहरातील गुन्हेगारी नियंत्रण व अन्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आम्ही अतिशय बारीकसारीक तपशिलांचा विचार करून नियोजन केले आहे. या शहरात आयुक्तालय स्थापन झाले तेव्हा सात पोलिस ठाणी होती. आता त्यांची संख्या 13 पोलिस ठाणी व एक सायबर सेल आहे. या 13 पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत प्रत्येकी पाच चौक्‍या आहेत. अशी 65 बीट करण्यात आली. या बीटमध्ये 20 ठिकाणे निश्‍चित केली. तेथे 'क्‍यूआर' कोड ठेवला आहे,"

पोलिसांना आठ तास ड्युटी

पोलिसांची ड्यूटी 12 तासांवरून आठ तास करून तीन शिफ्ट केल्या. एक शिफ्ट रात्री एकला सुरू होते. या बीट मार्शलने प्रत्येक 20 ठिकाणी जाऊन क्‍यूआर कोड स्कॅन करायचा आहे. तसे केले, की नियंत्रण कक्षात बीट मार्शलने ड्यूटी केल्याची नोंद होते. सामान्यतः दरोडे पहाटे तीन ते चार वाजता होतात. रात्री एकच्या ड्यूटीने पोलिस तत्पर असतात. त्यातून दरोड्याचे प्रकार नियंत्रणात येतील. हे बीट मार्शल एखादा प्रसंग, घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यावर पाच ते सहा मिनिटांत घटनास्थळी पोचतात. 

ते पुढे म्हणाले, ''शहरात मुथूट फायनान्स संस्थेवर दरोडा पडला. या वेळी संबंधित दरोडेखोरांनी मोबाईल वापरले नव्हते. बेऊर जेलमध्ये असलेल्या गुन्हेगाराने त्याचे प्लॅनिंग केले होते. यातील सहा दरोडेखोरांना एकमेकांची नावेदखील माहिती नव्हती. तरीही माहिती मिळताच सहा मिनिटांत आमचे पोलिस तेथे पोचले होते. हा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आला. नाशिक शहर पोलिसांचा रिसपॉन्स टाइम पाच ते सहा मिनिटे असल्याने गुन्हेगारी नियंत्रणासाठी त्याचा मोठा उपयोग होतो आहे,''

आयुक्त नांगरे-पाटील यांनी पोलिसांच्या नव्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, की शहरात यापूर्वी विविध टोळ्या कार्यरत होत्या. त्या आपली दहशत निर्माण करण्यासाठी खून करीत असत. यावर कारवाई करण्यात आली. सहा टोळ्यांवर मोका लावण्यात आला. बारा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई केली. त्यामुळे एक वर्षात त्यांच्या कारवाया थंडावल्या. गतवर्षी याच कालावधीत 40 खून झाले होते. आता ती संख्या नियंत्रणात आली,'' 

''हेल्मेट, वाहतूक नियम हे विषय स्वतंत्र हाताळले. त्यात दोन हजार गाड्या जप्त केल्या. हेल्मेट नसलेल्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्त्यांवरील अपघात घटले. गतवर्षी विविध अपघातांत 217 मृत्यू झाले होते. यंदा त्यात घट होऊन 158 मृत्यू झाले. हे प्रमाण शून्यावर यावे हे आमचे उद्दिष्ट आहे. एकंदर पोलिस व्हिजिबल झाले आहेत. त्यांची कारवाई दृष्टीस पडू लागली आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com